पुणे: अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे औद्योगिक गॅसपुरवठा बंद करण्यात आला आहे. परिणामी येत्या 14 मार्च पर्यंत गॅसवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगातील कामकाज ठप्प पडण्याची शक्यता आहे.
आखातातील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे 1 मार्च पासून या प्रदेशातून जहाजांचा प्रवास थांबला आहे. परिणामी आखाती देशातून होणारा द्रवरुप नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या गॅसला सरकारने प्राधान्य दिले असून, व्यावसायिक आणि औद्योगिक गॅसचा पुरवठा कमी केला आहे. गॅस वितरण कंपन्यांनी आपल्या ग््रााहकांना औद्योगिक कारणासाठी गॅस वितरण बंद केल्याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, पिंपरी-चिंचवड परिसरात किमान सात हजार लघु उद्योगांना फॅबिकेशनसह विविध कामांसाठी गॅस आवश्यक असतो. मला स्वतःला दररोज एक ते दोन गॅस सिलिंडर लागतात. कोरोना कालावधीत ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याने प्लाझ्मा हँड कटिंग मशिनचा वापर केला होता. आता तसा वापर सुरू करावा लागेल. या यंत्राची किंमत एक लाख रुपये आहे.
फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल म्हणाले, प्रक्रिया उद्योग, हिट ट्रिटमेंट, पावडर कोटिंगसह विविध कारणांसाठी उद्योगांमध्ये गॅसचा वापर केला जातो. गॅस वितरण कंपन्यांनी उद्योगांना गॅस देणार नसल्याचे सांगितले आहे. सोमवारी (दि. 9) दिवसभरात किमान दहा ते बारा कंपन्यांनी गॅस देणे बंद केल्याची तक्रार संघटनेकडे केली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग््राीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, आखाती देशातील युद्धामुळे इंधन वाहतूक विस्कळीत झाल्याने काही प्रमाणात उद्योगांना फटका बसला आहे. मात्र, त्याची तीवता फार नाही. युद्ध लांबल्यास नक्कीच परिणाम जाणवेल.
चाकण येथे पॅकेजिंग कंपनीचे संचालक शिवहरी हालन म्हणाले, पेंट कंपन्यांना लागणारे लोखंडी डब्बे तयार करण्याची कंपनी आहे. या पत्र्याच्या डब्यांना कोटिंग करण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. अगदी 19 किलोपासून 425 किलो वजनाचे सिलिंडर असतात. गॅस वितरण कंपन्यांनी सोमवारी औद्योगिक गॅस वितरण बंद केल्याचे सांगितले. गॅसपुरवठ्याअभावी गॅसवर अवलंबून असणाऱ्या चाकणमधील बऱ्याच उद्योगांचे कामकाज 14 मार्चपर्यंत ठप्प पडेल.