Maharashtra Weather Prediction July 2025
पुणे : राज्यात हवेचा दाब वाढल्याने पावसाचा जोर कमी होत आहे. साधारणपणे 22 जुलैपर्यंत असेच वातावरण राहील. दरम्यारतात झारखंड, बिहार राज्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने त्या भागात पाऊस वाढला आहे, त्याचा किंचित परिणाम म्हणून राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे.
राज्यात हवेचे दाब हे 1004 ते 1006 हेक्टा पास्कल इतके वाढले आहेत. त्यामुळे तुरळक भागातच मध्यम पाऊस सुरू आहे. मात्र, राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी झाला आहे. अशी स्थिती 22 जुलैपर्यंत राहणार असून, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस चांगला राहील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आगामी पाच दिवस काही भागांतच हलका पाऊस पडेल. मात्र, बहुतांश भागातून मोठे अलर्ट क्षीण झाले आहेत.16 ते 19 जुलैदरम्यान अशी स्थिती हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यातच पाऊस पडेल. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्रातील पाऊस पूर्ण कमी होत आहे.
परभणी (18), हिंगोली (18), नांदेड (17,18), लातूर (17), धाराशिव (17), अकोला ( 16), यवतमाळ (16), भंडारा (16,17),बुलडाणा (16), गोंदिया (17,18), चंद्रपूर (17), नागपूर (16)
पुण्यात मंगळवारी किती पाऊस पडला?
पुणे शहरासह परिसरात दमदार पावसाने मंगळवारी हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले. त्यामुळे विद्यार्थासह बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. शहरात सरासरी 8.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लवळे 20 मि.मी.ची नोंद झाली.
पहाटेपासूनच मंगळवारी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बच्चेकंपनीला रेनकोट घालूनच शाळेत जावे लागले. अधून मधून थांबत पाऊस दुपारपर्यंत सुरुच होता. सकाळी 11 च्या सुमारास पुन्हा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सर्व पेठा आणि उपनगरांतील खड्डे, सखल भाग पुन्हा जलमय झाले.
रस्त्यावर चिखल तयार झाल्याने पादचारी आणि वाहनधारकांची तारांबळ उडाली. शाळेत सोडताना आणि पुन्हा शाळा सुटण्याच्या वेळी पाऊस आल्याने विद्यार्थी पालकांना छत्री, रेनकोटचा आधार घ्यावा लागला.
मंगळवारी पुण्यात झालेला पाऊस
शिवाजीनगर 8.3, पाषाण 13.5, लोहगाव 5.5, चिंचवड 3, लवळे 20, मगरपट्टा 8.5, कोरेगावपार्क 1, एनडीए 14.5