पुणे: शिक्षणाची राजधानी आणि स्पर्धा परीक्षांचे मुख्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अभ्यासासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा थेट परिणाम शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येत आहे. त्यामुळे अनधिकृत अभ्यासिका, पेइंग गेस्ट होस्टेल व वाढलेली गर्दी याबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. शहरातील अनधिकृत अभ्यासिका व त्याच्या आसपास चालणाऱ्या हातगाड्यांवर येत्या 7 दिवसांत थेट कारवाईचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.
शहरातील मध्यवर्ती पेठा तसेच उपनगरांमध्ये अनेक निवासी मिळकतींमध्ये स्पर्धा परीक्षांचे वर्ग, अभ्यासिका आणि होस्टेल चालवले जातात. ज्या इमारतींमध्ये क्लासेस, होस्टेल आणि अभ्यासिका सुरू आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासह अभ्यासिकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका आणि परिसरातील अतिक्रमणांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून, त्याची पालिकेने दखल घेतली. याबाबतची बैठक अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतली.
या बैठकीला अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर, परिमंडळ क्र. 5 चे उपायुक्त निखिल मोरे, कसबा-विश्रामबागवाडा सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कर्पे, मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश शेलार आणि रा.काँ.चे राहुल देखणे उपस्थित होते.
या बैठकीत विद्यार्थ्यांमुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत व नागरिकांच्या तक्रारींबद्दल चर्चा झाली. अनधिकृत अभ्यासिका, पेइंग गेस्ट यांचे सर्वेक्षण करावे, अभ्यासिकांजवळ रात्रीच्या वेळी सुरू राहणाऱ्या व्यवसायांवर कारवाई करावी. मिळकतकर विभागाकडून अभ्यासिका व पेइंग गेस्टचे सर्वेक्षण करावे, यासंदर्भात पुढील 15 दिवसांत पोलिसांसमवेत बैठक घेण्यात यावी आदी निर्णय घेण्यात आले. यासंदर्भात 17 डिसेंबर रोजी आढावा बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
अभ्यासिकांमध्ये वाढ आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिकृत 750 पेक्षा अधिक अभ्यासिका आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांची संख्या 2,000 पेक्षा जास्त आढळते. नवी पेठेतील धुवतारा अभ्यासिकेला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने या अभ्यासिकांचे सर्वेक्षण केले होते. अग्निशमन दलाकडून फायर ऑडिट आवश्यक होते, परंतु त्यानंतरची कारवाई प्रशासनाकडून राबवली गेली नाही. विद्यार्थी जीव धोक्यात घालून दाटीवाटीच्या इमारती, जुने वाडे आणि इमारतींच्या पार्किंगमध्ये चालणाऱ्या अभ्यासिकेत अभ्यास करत असल्याचे निदर्शनास आले.
तिप्पट कर आकारणी करणार
शहरातील मध्यवर्ती पेठा तसेच उपनगरांमध्ये अनेक निवासी मिळकतींमध्ये स्पर्धा परीक्षांचे वर्ग, अभ्यासिका आणि होस्टेल सुरू आहेत. अशा मिळकतदारांकडून निवासीऐवजी व्यावसायिक दराने मिळकतकर आकारले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले आहे.