Construction Air Pollution Pudhari
पुणे

Pune RMC Plant Pollution: पुण्यात बेकायदेशीर आरएमसी प्लांट्सवर कारवाईची मागणी; रहिवासी भागांत प्रदूषणाचा वाढता धोका

स्थायी समितीसमोर प्रस्ताव; प्लांट्स सील करून दंडात्मक कारवाईचा आग्रह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील अनेक रहिवासी भागांमध्ये सिमेंट काँक्रीट रेडीमिक्स (आरएमसी) प्लांट्‌‍स बेकायदेशीरपणे सुरू असल्याने वाढते वायुप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका गंभीर स्वरूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील अशा सर्व आरएमसी प्लांट्‌‍सना तातडीने बंद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.

नगरसेवक हरिदास चरवड यांनी हा प्रस्ताव सादर करताना रहिवासी भागांमध्ये औद्योगिक स्वरूपाचे उपक्रम चालविणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले. आरएमसी प्लांट्‌‍समधून निर्माण होणारे सिमेंटचे सूक्ष्म कण आणि धूळ हवेत मिसळून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत असून, श्वसनविकारांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या प्लांट्‌‍समुळे मोठ्या वाहनांची सततची वर्दळ वाढून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याचबरोबर अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत. पर्यावरणीय नियमांचे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींचे उल्लंघन करून हे प्लांट्‌‍स सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रस्तावानुसार, महापालिकेच्या अतिक्रमण, बांधकाम आणि पर्यावरण विभागांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर आरएमसी प्लांट्‌‍स तातडीने सील करावेत आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. यासोबतच सर्व प्लांट्‌‍सच्या परवानग्या, पर्यावरणीय मंजुरी आणि झोनिंग नियमांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावित भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रदूषण आणि अपघातांच्या घटनांची चौकशी करून जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. भविष्यात रहिवासी भागांमध्ये अशा औद्योगिक प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असा ठाम आग््राहही या प्रस्तावातून व्यक्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT