ACB Bribe Case Pudhari
पुणे

Pune Crime: गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश; १५ लाखांसाठी दोन पोलिस हवालदारांसह चौघे एसीबीच्या जाळ्यात

गुन्हा दाखल न करण्यासाठी आधी २५ लाखांची मागणी; अटकपूर्व जामीन व कलमे टाळण्यासाठी ३० लाखांची मागणी केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. मात्र, लाच देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन, गर्भलिंगनिदान विरोधी कायद्याची कलमे न लावण्यासाठी गुन्ह्याचे तपास अधिकारी यांच्यासाठी २५ लाख रुपये व स्वतःसाठी ५ लाख रुपये, अशी लाच मागणी करून पोलिस हवालदाराने १० लाखांची लाच घेतली. त्यानंतर राहिलेल्या पंधरा लाखांच्या लाचेत दोन पोलिस कर्मचारी आणि दोन खासगी व्यक्ती जाळ्यात अडकले. यातील खासगी व्यक्तींना लाच घेतना रंगेहाथ एसीबीच्या पथकाने पकडले. तर, दोघे पोलिस हवालदार हे फरार झाले आहेत.

आबा सावळा वळकुंदे (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि महादेव पंढरी माने (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे (नातेपुते पोलिस ठाणे), राहुल मारुती वाघ (रा. अकलूज सोसायटी, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. अनिल शिंदे हा अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या कार्यालयात सध्या कर्तव्यार्थ आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती. अकलूज परिसरातील महिलांचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्यासाठी एजंट बाहेर गावी घेऊन जात आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी महिला व महिला पोलिस उपनिरीक्षक या दोघींना गर्भलिंग निदान चाचणीसाठी बनावट ग्राहक बनवले. एजंटाने त्यांना एका फार्म हाऊसवर नेले. तेथे गर्भलिंगनिदान चाचणी सुरू असताना, पथकाने डॉक्टरला पकडले. त्या वेळी डॉक्टराने शिवीगाळ करून तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. जवळच बसलेला एजंट व डॉक्टराने चारचाकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आरोपींनी त्यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी सर्व साहित्य घेऊन फरार झाले होते. याप्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस हवालदार अनिल शिंदे याने खासगी व्यक्ती आबा वळकुंदे याच्या मोबाईलद्वारे तक्रारदाराशी संपर्क साधला. तुम्ही जर यापूर्वीच २५ लाख रुपये दिले असते, तर गुन्हा दाखल झाला नसता. आता त्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता, तसेच पीसी अँड पीएनडीटी या कायद्याची कलमे न लावण्याकरिता गुन्ह्याचे तपास अधिकारी डीवायएसपी संतोष वाळके यांच्याकरिता २५ लाख रुपये व काम झाल्यानंतर स्वत:साठी ५ लाख रुपये, अशी लाचेची मागणी केली.

शिंदे याने १० लाख रुपये लाच स्वीकारली. उर्वरित १५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. अशी तक्रार तक्रारदाराने २१ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीची २४ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. गुन्ह्यातील इतर दोन आरोपींसाठी यापूर्वी अनिल शिंदे याने १० लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान खासगी व्यक्ती आबा वळकुंदे व महादेव माने यांनी तक्रारदार यांचे आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व नोटीस देण्यास सांगतो, असे बोलून डीवायएसपी वाळके याच्याकरिता ५ लाख व वाघ पोलिस याचे करिता ५० हजार रुपये असे साडेपाच लाख रुपयांची मागणी केली. २८ ऑगस्ट रोजी फोन करून घेऊन येण्यास सांगितले. त्यास पोलिस हवालदार राहुल वाघ याने प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आबा वळकुंदे व महादेव माने यांना माळशिरस येथील पिलीव रोडच्या पुलाखाली साडेपाच लाखांची लाच घेताना सापळा रचून पकडण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली असून, दोघे पोलिस फरार झाले आहेत. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नीता मिसाळ व सतीश वाळके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहा फौजदार राजेश बाटे, पोलिस हवालदार दगडू सोनावणे, पोलिस अंमलदार प्रवीण तावरे, अश्विन कुमकर यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT