Arrested Pudhari
पुणे

Pune IIT Admission Fraud Gang: आयआयटी प्रवेशाच्या आमिषाने पालकांची लाखोंची फसवणूक; पुण्यातून टोळीतील १० जणांना अटक

विमाननगर-खराडीतून पालकांना फोन; ३५ जणांची फसवणूक, १.३५ कोटींची मालमत्ता जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विमाननगर आणि खराडी परिसरातून देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबईच्या पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पवई पोलिसांनी पुण्यात येऊन कारवाई करत या प्रकरणातील आरोपींना अटक केली. बिहारचा रहिवासी असलेला कथित मास्टरमाइंड सोनू कुमार (वय ३५) याच्यासह एकूण दहा जणांना अटक केली आहे.

पुणे पोलिसांचे पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या टोळीतील दोन आरोपी विमाननगरमधील निऑन हॉटेलमधील खोली क्रमांक २०४ मध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पवई पोलिसांच्या पथकाने पुण्यात येऊन दोघांना अटक केली. तपासात विमाननगर आणि खराडी परिसरातून पालकांना फोन करून प्रवेशाचे आमिष दाखविले जात असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, टोळीतील आरोपी आयआयटी, आयआयआयटी तसेच दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (डीटीयू) यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये एनआरआय आणि व्यवस्थापन कोट्यातून थेट प्रवेश मिळवून देण्याचा दावा करत होते. पालकांचा विश्वास संपादन करून सुरुवातीला टोकन रक्कम आणि त्यानंतर प्रवेशाच्या नावाखाली लाखो रुपये घेतले जात होते. ही टोळी २०२४ पासून सक्रिय असल्याचा पोलिसांचा दावा असून, आतापर्यंत देशभरातील सुमारे ३५ जणांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या टोळीतील अनेक आरोपी उच्चशिक्षित असून, काहींनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

महिलेची १६.५० लाखांची फसवणूक

या टोळीचा पर्दाफाश पवईमधील ४७ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर झाला. त्यांना आपल्या मुलाचा आयआयटी हैदराबादमध्ये प्रवेश करून घ्यायचा होता. सोशल मीडियावरील जाहिरात पाहिल्यानंतर त्यांनी आरोपींशी संपर्क साधला. गौतम आणि सुमित अशी नावे सांगणाऱ्या आरोपींनी प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून १६.५० लाख रुपये घेतले. मात्र, प्रवेश झाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल क्रमांक, लोकेशन आणि बँक व्यवहारांच्या आधारे तपास सुरू केला. या तपासाची कडी पुण्यापर्यंत पोहोचल्यानंतर पवई पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले.

१.३५ कोटींची मालमत्ता जप्त

तपासादरम्यान आरोपींशी संबंधित ठिकाणे आणि बँक खात्यांमधून सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये २२ महागडे स्मार्टफोन, २३ सक्रिय बनावट सिमकार्ड, एक लॅपटॉप, एक जिओबुक, सात डेबिट कार्ड आणि दोन मोटारींचा समावेश आहे. बँक खात्यांमधील सुमारे २४ लाख रुपयेही पोलिसांनी सील केले आहेत.

फसवणुकीच्या रकमेनुसार कमिशन

टोळीतील कॉल करणाऱ्या सदस्यांना फसवणुकीच्या रकमेनुसार कमिशन दिले जात असल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे. एखाद्या पालकाकडून जितकी अधिक रक्कम उकळली जाईल, तितके अधिक कमिशन कॉल करणाऱ्या आरोपीला मिळत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT