Patient Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav DJ Noise Hospitals: रुग्णालयांनाही डीजेचा दणदणाट; गंभीर रुग्णांच्या आरोग्यावर घाला!

हृदयरोगी, न्यूरोलॉजीचे रुग्ण आणि नवजात बाळांना मोठा त्रास; हॉस्पिटल परिसरात डीजे-डॉल्बीवर कडक निर्बंधांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात गणेशोत्‍सवादरम्यान वाजवले जाणारे उच्चस्‍तराचे डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टिम रुग्णांच्या जिवावर बेतत आहेत. अतिआवाजामुळे रुग्णालयांमध्ये उपचाराधीन असलेल्या गंभीर रुग्णांना आणि विशेषतः हृदयविकार व न्यूरोलॉजीच्या पेशंट्सना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील अनेक प्रमुख रुग्णालये रहिवासी व व्यावसायिक परिसराजवळ असल्याने डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे रुग्णांच्या झोपेचे आणि विश्रांतीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले जाते. प्रशासनाने कठोर पावले उचलावीत आणि शांतता क्षेत्र असलेल्या रुग्णालयांच्या परिसरात डीजे-डॉल्बीच्या वापरावर तातडीने कडक बंधने आणावीत, अशी आर्त हाक त्रस्त रुग्‍णालयाच्या व्यवस्थापनाकडून होताना दिसून येत आहे. यानिमित्त शहरातील काही रुग्‍णालयांशी दै. 'पुढारी'ने साधलेला संवाद...

गणेशोत्‍सवाच्या काळात जे रुग्‍ण उपचारांसाठी दाखल असतात. त्‍यांना या आवाजाचा अधिक त्रास होत असतो. विशेषतः लहान बाळांवर अधिक परिणाम होत असल्याचे आढळून येते. त्यामुळे त्‍या काळात ध्वनिरोधक रूममध्ये या रुग्‍णांवर उपचार केले जातात.
डॉ. आशा काळे (आशाकिरण हॉस्‍पिटल, नारायण पेठ)
गणेशोत्‍सवाच्या काळात डीजे, डॉल्‍बी आणि प्‍लाझ्मासारखे ध्वनिवर्धक लावले जातात. डीजेपेक्षा ही प्‍लाझ्मा आणि लेझर लाईट हे अधिक घातक आहेत. वास्‍तविकस त्यावर अधिक निर्बंध आणले पाहिजेत. उत्‍सवकाळात विशेषतः मिरवणूक संपल्‍यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेले कार्यकर्ते आणि स्‍थानिक नागरिक कान, नाक, घसा आणि डोळ्यांच्या आजारांसाठी उपचार घेताना दिसून येतात. त्‍यामुळे डीजेपेक्षाही प्‍लाझ्मा आणि लेझर लाईटला विरोध आहे.
डॉ. मिलिंद भोई (कान, नाक, घसातज्ज्ञ)
गणेशोत्‍सवाच्या काळात डीजेच्या आवाजामुळे येथील अनेक रुग्‍णांना त्रास होत असतो. आम्‍ही रस्‍त्याच्या बाजूला असलेल्या सर्व पेशंटना त्या दोन दिवसांमध्ये आतमधील रूममध्ये घेत असतो. परंतु, अशा कर्णकर्कश आवाजावर निर्बंध आणणे गरजेचे आहे.
सुजित पवार (व्यवस्‍थापक, शैशव मुलांचे हॉस्‍पिटल, कुमठेकर रोड)
गणेशोत्सवाच्या काळात उपचार घेत असलेल्या रुग्‍णांना आवाजाचा नाहक त्रास होत असतो. परंतु, संस्‍कृती असल्याने यावर आम्‍ही काही बोलत नाही. अशा पद्धतीने आवाजावर निर्बंध असणे आवश्यक आहे.
महात्‍मा गांधी रुग्‍णालय, कुमठेकर रोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT