Heatwave Pudhari
पुणे

Heatwave India Study: देशात उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ; पुण्यात IITM-आरबीआय करार

गेल्या 50 वर्षांत तापमान वाढ; हवामान जोखीम अभ्यासासाठी रिझर्व्ह बँकेचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: गत 51 वर्षांत देशात तब्बल 706 उष्णतेच्या लाटा आल्या. 1970 पर्यंत वर्षात सरासरी फक्त तीन उष्णतेच्या लाटा तयार होत होत्या. मात्र, गत 20 वर्षांपासून एका वर्षात तब्बल 25 उष्ण लाटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. यंदाचा उन्हाळा कडक असून, पारा 45 अंशांवर पोहोचण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. हा विषय अर्थकारणाशी निगडित असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) प्रथमच पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) समवेत करार केला आहे.

गत 50 वर्षांत भारतीय हवामानात मोठे बदल झाले असून, उष्णतेच्या लाटांमध्ये दीडपटीने वाढ झाली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेट्रोलॉजीच्या (आयआयटीएम) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतात उष्णतेच्या लाटांची वारंवारता वाढली असून, बहुतांश राज्ये ही उष्ण लाटांची हॉटस्पॉट बनली आहेत. आयआयटीएमचे शास्त्रज्ञ डॉ. श्रावणी बॅनर्जी, डॉ. बी. पद्माकुमारी आणि डॉ. एम. व्ही. रमणा यांनी यावर विशेष शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे.

39 वर्षांचा डेटा वापरून केला अभ्यास

या अभ्यासात शास्त्रज्ञांनी 1981 ते 2020 या 40 वर्षांतील आकडेवारी वापरली आहे. संपूर्ण देशातील हवामान हंगामासाठी पुन:विश्लेषण आधारीत दररोजच्या कमाल तापमानाचा डेटा घेतला आहे. भारतात गत 40 ते 50 वर्षांत उन्हाळ्यात 1 ते 1.12 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे उष्ण लाटांची वारंवारता, कालावधी आणि व्याप्ती वाढली आहे.

रिझर्व्ह बँकेचा प्रथमच पुढाकार

दोन दिवसांपूर्वी हवामान विज्ञानाला आर्थिक जोखीम मूल्यांकनाशी जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (आयआयटीएम) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांनी हवामान जोखीम संशोधन आणि डेटा विकासातील सहकार्य वाढविण्यासाठी 16 मार्च 2026 रोजी (3 वर्षांसाठी) एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याचा उद्देश रिझर्व्ह बँक क्लायमेट रिस्क इन्फॉर्मेशन सिस्टिमच्या विकासाला पाठिंबा देणे आहे.

‌‘अल निनो‌’च्या प्रभावाचा परिणाम

शास्त्रज्ञांनी 40 वर्षांच्या तापमानाची आकडेवारी तपासली, तेव्हा असे लक्षात आले की, ‌‘अल निनो‌’च्या प्रभावामुळे उष्ण लाटांची वारंवारता वाढली आहे. सन 1981 ते 2000 आणि 2001 ते 2020 या 20 वर्षांत ‌‘अल निनो‌’ किंवा ‌‘ला निना‌’ स्थिती नव्हती. ती तठस्थ होती, तेव्हा भारतात उन्हाळ्यामध्ये तापमानात 0.77 ने वाढ झाली आहे, तर ‌‘अल निनो‌’ सक्रिय असताना मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत कमाल तापमानात 1.03 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

स्थानिक हॉटस्पॉटमध्ये दीडपटीने वाढ

सर्वांत असुरक्षित आणि हॉटस्पॉटप्रवण प्रदेश ओळखण्यासाठी एचडब्ल्यू हॉटस्पॉट इंडेक्स (एचएचआय) सादर केला जातो, ज्याचे मूल्यांकन उपग््राहआधारित डेटा वापरून केले जाते. जे सन 1981 ते 2000 आणि सन 2001 ते 2020 यादरम्यान हॉटस्पॉटच्या स्थानिक व्याप्तीमध्ये सुमारे 1.5 पट वाढ दाखवते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT