Infection Pudhari
पुणे

Pune Heatwave Infections: पुण्यात उष्णतेचा कहर; संसर्गजन्य आजारांत वाढ

डोळे, त्वचा आणि मूत्रमार्गाच्या संसर्गात वाढ; डॉक्टरांचा सावधगिरीचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनसह डोळ्यांचे संसर्ग, त्वचारोग आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे संसर्गाचा प्रसार वेगाने आणि तीव स्वरूपात होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात विशेषतः मुलांमध्ये डोळ्यांची ॲलर्जी जास्त प्रमाणात आढळते. यामध्ये तीव खाज आणि पाणी येणे यांसारखी लक्षणे दिसतात, पण चिकट स्त्राव नसतो, म्हणून ती कंजंक्टिव्हायटिसपेक्षा वेगळी असते. उन्हामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा, चुरचूर आणि डोकेदुखी होऊ शकते.

अतिउष्णता, निर्जलीकरण आणि तापमानात होणारा चढउतार हे या संसर्गात वाढ होण्यास कारणीभूत ठरतात. शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे राखणे, स्वच्छ राहणे, सुती अंतर्वस्त्रांचा वापर करणे आणि जास्त काळ लघवी रोखून न धरणे यामुळे संसर्गाची शक्यता कमी होऊ शकते. दमट परिस्थितीसह तापमानात वाढ झाल्यामुळे बुरशीजन्य संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

वातावरणातील बदल आणि दमट हवेमुळे आपल्या अंगावर घाम येतो. हा घाम त्वचेच्या माध्यमातून कपड्यात शिरतो. त्यामुळे त्वचेवर बुरशी येण्यास अनुकूल असे वातावरण तयार होण्यास मदत होते. या संक्रमणांमुळे प्रभावित भागात जास्त खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येणे दिसून येतात.

डोळ्यांमध्ये झिल्ली तयार होणे, सूज, आणि तीव वेदना यांसारखी तीव लक्षणे निर्माण करतात. याव्यतिरिक्त डोळ्यांतील चिकट स्राव, पाण्याचा सतत ओघ आणि पापण्यांमध्ये जळजळ अशी लक्षणे सर्वसामान्य रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. थंड पाण्याच्या पट्‌‍ट्या, अँटीबायोटिक औषधांचे डोळ्यांचे थेंब वापरणे फायदेशीर ठरते.
डॉ. दीपक साळुंखे, नेत्रतज्ज्ञ
उन्हाळ्यात ॲलर्जी होणे, चेहरा काळा पडणे, घामामुळे बुरशीजन्य संसर्ग होणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत. मार्च-एप्रिल महिन्यापासून अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ होते. मुलांची त्वचा संवेदनशील असल्याने पालकांनी काळजी घ्यावे.
डॉ. अलका केळकर, त्वचारोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT