पुणे: घरासमोर येऊन हॉर्न वाजवीत मामाच्या मुलीवर लाइन मारत असल्याच्या गैरसमजातून तरुणास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमुजरी आणि प्रत्येकी 51 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अमोल बाळासाहेब बोरकर (वय 33) आणि सागर विजय काळे (वय 33, रा. दोघेही रा. काळेपडळ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे. सत्र न्यायाधीश एस. आर. अग््रावाल यांनी हा निकाल दिला. दंडाच्या रकमेतून 80 हजार रुपये जखमीस देण्यास यावे, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.
ही घटना 25 जून 2018 रोजी काळेपडळ परिसरात घडली. प्रतीक सकपाळ (वय 20) असे घटनेतील जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, मारुती सकपाळ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रतीक हा फिर्यादी मारुती यांचा मुलगा आहे. प्रतीक याचा मित्र हा आरोपीच्या शेजारी राहण्यास आहे. तो मित्राला भेटायला जात असताना घरासमोर हॉर्न वाजवीत होता. यावरून, प्रतीक हा मामाच्या मुलीवर लाइन मारत असल्याचा गैरसमज आरोपींमध्ये निर्माण झाला.
त्यातून आरोपींनी प्रतिकला हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे धारदार शस्त्राने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी, आरोपींना अटक करीत दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी कामकाज पाहिले.