Coconut Pudhari
पुणे

Pune Coconut Market: भाव उतरल्याने नारळ विक्री सुसाट; गुलटेकडी मार्केट यार्डातून दररोज अडीच लाख नारळांची विक्री

गतवर्षीच्या तुलनेत भावात शेकड्यामागे सहाशे रुपयांची घट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: लाडक्या गणरायाच्या आगमनाने गुलटेकडी मार्केट यार्डातील नारळ बाजाराला चांगलीच गती आली आहे. बाप्पाच्या पूजेसाठीच्या तोरणापासून ते प्रसादाच्या मोदकापर्यंत नारळाला मोठी मागणी असून, घाऊक बाजारातील दैनंदिन विक्री तब्बल अडीच लाख नगांवर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे मागणी वाढलेली असतानाही नारळ उत्पादक काही पट्ट्यांतील कमी पावसाचा फटका प्रतवारीला बसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत शेकड्यामागे २०० ते ६०० रुपयांनी भाव कमी आहेत. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एका नारळाची ४० ते ७० रुपयांना विक्री होत आहे.

दर वर्षी गणेशोत्सवाच्या काळात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारातील नारळाची उलाढाल वाढते. सद्य:स्थितीत बाजारात तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून नारळाची दररोज तीन लाख नगांची आवक होत आहे.

येथून शहरासह पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांसह हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी कायम आहे.

मात्र, यंदा नारळ उत्पादक काही भागांत कमी पाऊस झाल्याचा परिणाम उत्पादनासह नारळाच्या आकार आणि दर्जावर झाला आहे. बाजारातील आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास स्थिर असली, तरी अपेक्षित प्रतवारीचा माल कमी असल्याने भावात २० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गणेशोत्सवामुळे नारळाच्या मागणी आणि विक्रीत मोठी वाढ झाली असून, सध्या दररोज सुमारे अडीच लाख नारळांची विक्री होत आहे. मात्र, यंदा काही उत्पादक भागांत कमी पावसामुळे नारळाचा आकार आणि प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागणी चांगली असूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत नारळ स्वस्त आहे.
- दीपक बोरा, नारळ व्यापारी, मार्केट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT