पुणे: लाडक्या गणरायापाठोपाठ गौराईचे आगमन झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फुले, फळे आणि भाजीपाला बाजारात गुरुवारी खरेदीची लगबग वाढली. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर नैवेद्यासाठी हिरवा माठ, शेपू, मेथी, अळूची पाने, अंबाडी तसेच भोपळ्याच्या पाल्याला मोठी मागणी राहिली.
तर, गौराईच्या सजावटीसाठी डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशन, ऑर्किड आणि फिलरच्या पानांच्या खरेदीला वेग आला होता. डाळिंब, सफरचंद, मोसंबी, संत्री, सीताफळ, कणीस, पेरू आणि चिकूलाही मागणी वाढली. त्यामुळे पालेभाज्यांसह फुले आणि फळांच्या भावात ५ ते १० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
गौराईसमोर फळफळावळ मांडण्याची परंपरा असल्याने फळबाजारातही ग्राहकांची वर्दळ वाढली होती. डाळिंब, सफरचंद, मोसंबी, संत्री, सीताफळ, पेरू, चिकू तसेच कणसाला यामध्ये मोठी मागणी राहिली. मागणीच्या तुलनेत उपलब्ध माल आणि प्रतवारीनुसार बहुतांश फळांच्या भावात ५ ते १० टक्क्यांची वाढ झाल्याचे फळांचे अडतदार सत्यजित झेंडे यांनी सांगितले.
तर गौराईची आरास आकर्षक करण्यासाठी फुलांनाही मोठी मागणी राहिली. पारंपरिक फुलांबरोबरच डच, गुलाब, जर्बेरा, कार्नेशन, ऑर्किड तसेच विविध प्रकारच्या फिलरच्या पानांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
घरगुती सजावटीसाठी फुलांच्या खरेदीत वाढ झाल्याने फुलबाजारातही उत्साहाचे वातावरण असल्याचे अखिल फुलबाजार अडते असोसिएशनचे समन्वयक आणि फुल अडतदार सागर भोसले यांनी नमूद केले.
गौरीपूजनाच्या नैवेद्यात विविध प्रकारच्या भाज्यांना विशेष महत्त्व असल्याने मार्केट यार्डातील तरकारी विभागात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी दिसून आली. हिरवा माठ, शेपू, मेथी, अळूची पाने, अंबाडी आणि भोपळ्याच्या पाल्याला प्रामुख्याने मागणी होती.
घाऊक बाजारात एका गड्डीला १० ते ३० रुपये तर, किरकोळ बाजारात या पालेभाज्यांची प्रतवारीनुसार ३० ते ७० रुपयांना विक्री झाली. सणामुळे नेहमीच्या तुलनेत पालेभाज्यांच्या खरेदीत वाढ झाल्याचे छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. गणेशोत्सवामुळे बाजारात आधीच असलेल्या उत्साहात गौराईच्या आगमनाने आणखी भर पडली आहे.
गौरीच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या पारंपरिक भाज्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. हिरवा माठ, शेपू, मेथी, अळूची पाने, अंबाडी आणि भोपळ्याच्या पाल्याला विशेष मागणी आहे. सणामुळे नेहमीच्या तुलनेत पालेभाज्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे.- चरण वणवे, किरकोळ पालेभाज्या विक्रेते.