Pune Groundwater Salinity Pudhari
पुणे

Water Quality Report: हवेली, शिरूर तालुक्‍यातील पाणी पिण्यास, शेतीसाठी अयोग्य!

पिण्याच्या पाण्यात क्षारची मात्रा जास्त; शेतीवर देखील होतोय गंभीर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

विनय पुराणिक

पुणे: जिल्ह्यातील पिण्याचे पाणी ९१.१३ टक्के योग्य आणि गुणवत्तापूर्ण असले, तरी हवेली, शिरूर या दोन तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्यामधील क्षार जिल्ह्यातील ११ तालुक्यांपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक बाब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) रासायनिक तपासणी अहवालात समोर आली आहे.

परिणामी हे पाणी पिण्यास तसेच शेतीसाठी देखील धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जीएसडीए विभागाने केल्या आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार, मान्सून पूर्व आणि उत्तरेत्तर मान्सून अशा दोन टप्प्यांत भूजल सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार मान्सून पूर्व प्रक्रियेतील १३ तालुक्यांतून जीएसडीएकडे सन २०२५-२६ या वर्षासाठी तीन हजार ७७५ पाण्यांचे नमुने प्राप्त झाले होते. सर्व पाण्यांचे नमुने प्रादेशिक उपसंचालक यांच्या अंतर्गत मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले.

त्यापैकी ३४४० नमुने (९१.१३ टक्के) पिण्यासाठी योग्य, तर ३३५ नमुन्यांचे (८.८७ टक्के) पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. यामध्ये हवेली तालुक्यातून २०९ पाण्याच्या नमुन्यांपैकी ११७ आणि शिरूर तालुक्यातून २९८ पैकी ११५ नमुन्यांच्या पाण्यांमध्ये मापकांनुसार क्षार कमी-जास्त असल्याची नोंद तपासणी अहवालात नमूद केले आहे.

हवेली आणि शिरूर या तालुक्यांतील परिस्थिती लक्षात घेता संबंधित विभागांनी दूषित जलस्रोतांचा शोध घेऊन तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याचे जीएसडीए विभागातील भू-वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले. 8पान २ वर

अयोग्य पाणी कसे ?

जीएसडीएच्या १५ सुरक्षित मानकांनुसार उत्तम पाण्यासाठी पाण्यात विरघळलेले घन पदार्थांच्या (टीडीएस- टोटल डिसॉल्वड सॉलिड्स) पाण्यातील क्षार, खनिजे, धातू, सूक्ष्म घन पदार्थ यांचे मिलिग्रॅम प्रतिलिटर आणि पीपीएम (पार्ट पर मिलीयन) ही मापके लावण्यात आली.

यामध्ये नैसर्गिकरीत्या भूजल, खडक आणि मातीतून वाहणाऱ्या पाण्यातील फ्लोराईड (फ्लोरीन) आणि न्यूट्रेट तपासणीनुसार पाण्यातील रासायनिक संयुगांची तपासणी करण्यात आली. अयोग्य पाणी असलेल्या तालुक्यांमधील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण २०० मिलिग्रॅम आणि न्यूट्रेटचे प्रमाण ४५ मिलिग्रॅमपेक्षा अधिक आहे. दीर्घकाळ पाण्याच्या वापरामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे मापदंडानुसार स्पष्ट होत असल्याचे जीएसडीएतील भू-वैज्ञानिक सांगतात.

पाणी खराब होण्याची कारणे

- रासायनिक खतांचा बेसुमार वापर

- सांडपाणी, मलनिस्सारण किंवा औद्योगिक प्रदूषण

- भूजलसाठ्याचा बेसुमार उपसा

- हवामान बदल

शेतीवर आणि पिकांवर होणारे तोटे

१) जमीन क्षारपड (Chopadaline Soil) होणे : सतत क्षारयुक्त पाण्याचा वापर केल्यास जमिनीच्या वरच्या थरावर क्षारांचा पांढरा थर साचतो. यामुळे जमिनीचा सामू (pH) बिघडतो आणि जमीन नापीक बनते.

२) पिकांची वाढ खुंटणे (Osmotic Effect) : जमिनीत क्षार जास्त साचल्यामुळे मुळांना पाणी शोषून घेण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मुबलक पाणी देऊनही पिके वाळू लागतात किंवा त्यांची वाढ मंदावते.

३) पिकांच्या पानांची जळजळ : पाण्यातील सोडियम आणि क्लोराईड पिकांच्या पानांपर्यंत पोहचल्यास पानांच्या कडा पिवळ्या किंवा तपकिरी पडून करपतात.

४) अन्नद्रव्यांची कमतरता : जमिनीत अतिरिक्त क्षार साचल्यामुळे पिकांना आवश्यक असलेली मुख्य अन्नद्रव्ये (जसे की स्फुरद, जस्त, लोह) मुळांना सहज उपलब्ध होत नाहीत.

५) उत्पादनात मोठी घट : जमिनीची सुपीकता आणि पिकांची ताकद कमी झाल्यामुळे शेतीचे उत्पादन २५% ते ५०% किंवा त्याहून अधिक घटू शकते.

६) ठिबक सिंचन/अवजारांचे नुकसान : क्षारयुक्त पाण्यामुळे ठिबकच्या नळ्या (Drip emitters) तुंबतात आणि पाइपलाइनवर क्षारांचे थर बसून सिंचन यंत्रणा खराब होते.

मानवी आरोग्यावर होणारे परिणाम

१) किडनीवर अतिरिक्त ताण आणि मूतखडा (Kidney Stones) : पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियमचे प्रमाण वाढल्याने मूत्रपिंडांना पाणी फिल्टर करण्यासाठी जास्त काम करावे लागते, ज्यामुळे मूतखडा (स्टोन) होण्याचा धोका वाढतो.

२) उच्च रक्तदाब (High Blood Pressure) : पाण्यात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास शरीरातील बीपी वाढतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका संभवतो.

३) पचनाच्या समस्या : जास्त क्षारयुक्त पाण्यामुळे पोटात जळजळ, गॅस, अपचन किंवा सतत अतिसाराची (Loose Motions) तक्रार होऊ शकते.

४) हाडे आणि दातांचे नुकसान : पाण्यात अतिप्रमाणात असणाऱ्या फ्लोराईड आणि इतर खनिजांमुळे दातांवर पिवळे डाग पडणे तसेच हाडे ठिसूळ होणे (Fluorosis) असे विकार होतात.

५) त्वचेचे आणि केसांचे विकार : असे पाणी पिण्याने व वापरल्याने त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे आणि केस गळणे या समस्या निर्माण होतात.

सुरक्षित मापदंडानुसार पुण्यातील पाणी पिण्यासाठी चांगले असून, केवळ हवेली आणि शिरूर तालुक्यातील पाण्यांच्या नमुन्यांमधील क्षार कमी-जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेला अहवाल पाठवून कार्यवाहीबाबत सूचना केल्या आहेत.
- जयंत मिसाळ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जीएसडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT