पुणे: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली.
सध्या द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू असून, बाजारभावही समाधानकारक असल्याची माहिती त्यांनी दिली. आखाती देशांमध्ये द्राक्ष निर्यात प्रामुख्याने डिसेंबर व जानेवारी महिन्यात होते. सध्या त्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात निर्यात सुरू आहे असल्याचे भोसले म्हणाले. फेबुवारी, मार्च व एप्रिल महिन्यांत युरोप, यूके आणि रशिया या देशांकडे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात केली जाते. सध्या आफिका खंडातूनही द्राक्ष निर्यात सुरू आहे.
त्यामुळे युद्धाचा निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही. द्राक्षांच्या बाजारभावाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मे महिन्यापासून सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे सुमारे 70 टक्के द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. केवळ 30 टक्के उत्पादन हाती आले. उत्पादन घटल्याने यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट दर मिळत आहेत. सध्या थॉमसन द्राक्षांना प्रतिकिलो 150 ते 160 रुपये, क्रिमसन द्राक्षांना 150 ते 170 रुपये दर मिळत असून, बिगर निर्यात दर्जाच्या द्राक्षांना देशांतर्गत बाजारात 70 ते 80 रुपये दर मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.