पुणे: पुणे ग्रँड टूरच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे १३६ किलोमीटरच्या मार्गावरील रस्ते चकाचक करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या मार्गावर पाणीपुरवठा, ड्रेनेज, एमएनजीएल, महावितरण, आय-ट्रिपल-सी, पोलिसांचे सीसीटीव्ही, यांसह विविध यंत्रणांकडून सुरू असलेली खोदाईची कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिले आहेत.
त्यानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात येणार असून, खोदाईची परवानगी मागणाऱ्या संबंधित यंत्रणांना कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कोणत्याही सेवा वाहिनीसाठी पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या मार्गिकेवर खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्याचे पावसकर यांनी सांगितले.
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा जानेवारी २०२७ मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक विभाग, पुणे शहर) मनोज पाटील, महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर तसेच विविध खात्यांचे प्रमुख आणि संबंधित आस्थापनांच्या अधिकार्यांची बैठक मुख्य इमारतीत झाली. या बैठकीत स्पर्धेच्या मार्गिकेवरील रस्ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. सायकल स्पर्धेच्या मार्गिकेवर विविध सेवा वाहिन्यांसाठी सुरू असलेल्या खोदकामांचा आढावा घेण्यात आला.
चारही पॅकेजची कामे सुरू
ग्रँड टूरसाठी चार पॅकेजमध्ये सुमारे १३६ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे चार टप्प्यांत करण्यात येणार आहेत. यातील काही रस्ते नव्याने, तर ५२ किमीचे रस्ते दुरुस्त करण्यात येणार आहेत. चारही पॅकेजची कामे सुरू झाली आहेत. यामध्ये रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण, चेंबरची पातळी रस्त्याशी समांतर करणे, पदपथांची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी नवीन पदपथ, तुटलेल्या दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगकामाचा समावेश आहे. भिंतींचे रंगकाम, सुशोभीकरण आणि लँडस्केपिंगची कामेही केली जाणार आहेत.
गतिरोधक हटवणार; स्पर्धेनंतर लगेच बसवणार
सायकलपटूंना सलग आणि गुळगुळीत पृष्ठभाग मिळावा, यासाठी स्पर्धेच्या मार्गावरील गतिरोधक आणि उंचावलेले पादचारी मार्ग तात्पुरते हटविण्यात येणार आहेत. सुमारे २०० ते २२५ गतिरोधक हटविण्यात येणार असून, स्पर्धा झाल्यावर अपघाताचा धोका टाळण्यासाठी ते तातडीने पुन्हा बसवण्यात येणार आहे.
रस्त्यांसाठी 'व्हीजी-४०' उच्च दर्जाच्या डांबराचा वापर
रस्त्यांच्या कामासाठी पूर्वी विचारात घेतलेल्या व्हीजी-३० ऐवजी यंदा व्हीजी-४० ग्रेडचे डांबर वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढेल, असे पावसकर यांनी सांगितले. रस्त्यांचे आयुष्य टिकवण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा आणि वारंवार होणारी खोदाई टाळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.