पुणे: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवार (दि. ९) अंतिम दिवस आहे. पदवीधर मतदारसंघात भाजपचे 'डमी' उमेदवार शरद लाड यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बंडखोर प्रताप ऊर्फ भैय्या माने आणि शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर प्रा. सचिन सानप यांच्यासह अन्य बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पदवीधर मतदारसंघात गुरुवारपर्यंत ६८ उमेदवार रिंगणात होते.
शिक्षक मतदारसंघात बंडखोरी कायम
शिक्षक मतदारसंघात गुरुवारपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नव्हता. त्यामुळे ४८ उमेदवार अद्याप रिंगणात आहेत. शिवसेनेचे बंडखोर प्रा. सचिन सानप यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास महायुतीसमोरील बंडखोरीचे आव्हान कायम राहणार आहे.
काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर, भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे)चे मंगेश चिवटे हे प्रमुख उमेदवार आहेत. माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि प्रा. सचिन सानप यांच्या उमेदवारीमुळे लढतीत चुरस वाढली आहे.
अर्जमाघारीच्या अंतिम दिवशी कोण रिंगणातून बाहेर पडते आणि कोण बंडाचा झेंडा कायम ठेवते, यावर दोन्ही मतदारसंघांतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेषतः भैय्या माने आणि प्रा. सचिन सानप यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१५ हजार मतांचे गणित
शिक्षक मतदारसंघातील मतदारसंख्या आणि बहुकोनी लढत पाहता सुमारे १५ हजार मतांचा टप्पा निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबतच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना मिळणारी मते कोणत्या दिशेने जातात, यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.