Investment Fraud Pudhari
पुणे

Pune Gold Investment Fraud: स्वस्तात सोने देण्याचे आमिष; पुण्यात ज्येष्ठ महिलेची 1.34 कोटींची फसवणूक

कात्रज परिसरातील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा; क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने 12 लाखांचीही फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्वस्तात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत ज्येष्ठ महिलेची तब्बल 1 कोटी 34 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 61 वर्षीय ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार हेमंत दत्तात्रय खरोटे (वय 45) आणि रूपाली हेमंत खरोटे (वय 38, रा. शिवशंभोनगर, कात्रज- कोंढवा रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज परिसरातील एका सोसायटीत राहतात. आरोपी दाम्पत्याशी त्यांची ओळख होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी आरोपींनी स्वस्त दरात सोने मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरून सोन्याच्या बिस्किटांची तसेच दागिन्यांची छायाचित्रे पाठवली. ‌‘सध्या सोन्याचा दर कमी असून, काही दिवसांत तो वाढणार आहे. त्यामुळे आत्ताच गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल,‌’ असे सांगून आरोपींनी तक्रारदार महिला व त्यांच्या पतीला सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

त्यानुसार आरोपींनी वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण 1 कोटी 49 लाख 95 हजार रुपये घेतले. दरम्यान, आरोपींनी त्यांना सुमारे 7 लाख 23 हजार रुपयांचे सोने तसेच 7 लाख 90 हजार रुपये परत दिले. मात्र, उर्वरित रक्कम परत न करता तसेच स्वस्तात सोने देण्याचे आश्वासनही पूर्ण केले नाही. त्यामुळे आरोपी दाम्पत्याने 1 कोटी 34 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून 12 लाखांना फसविले

क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चारेट्यांनी एकाची 12 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर भागातील एका 54 वर्षीय व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली.

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांच्या बँक खात्यात तक्रादाराने ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी 12 लाख 11 हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT