मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शाहरुख उर्फ अट्टीचा एन्काऊंटर झाला. (Pudhari Photo)
पुणे

Pune Police Encounter | एन्काऊंटरचा थरार: दरवाजा वाजला अन् अट्टीने पोलिसांवर ताणला कट्टा; पुण्यातील शाहरुख उर्फ अट्टी मोहोळ येथे चकमकीत ठार

Criminal Shahrukh Atti | मोक्कासह इतर अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या शाहरुख मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात तीन महिन्यांपासून लपून बसला होता

पुढारी वृत्तसेवा

Pune Police Encounter Criminal Shahrukh Atti in Mohol Taluka 

पुणे, पोखरापूर : एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथानकात ज्याप्रमाणे पोलिसांची टीम एखाद्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर करते. अगदी तशाच पद्धतीने मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात गेल्या तीन महिन्यांपासून मोक्का सह इतर अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख या गुन्हेगाराचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एन्काऊंटर केला. शाहरुखला पोलीस ताब्यात घेत असताना त्याने गावठी पिस्तलने पोलिसांच्या दिशेने फायर केली. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १५) पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शाहरुख उर्फ अट्टीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाने खालच्या मजल्यावर असलेल्या एका महिलेला शाहरुखचा फोटो दाखवला. तो इथेच राहतो का? असे विचारले, असता तिने वरच्या मजल्याकडे बोट दाखवत लहान खोलीत राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला घेऊनच वरचा मजला गाठला. त्या छोट्या खोलीत शाहरुख त्याच्या पत्नीसोबत राहत होता. पोलिसांनी वर जाताच घराचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने आतून त्याच्या बायकोने कोण आहे? असे विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत-असलेल्या त्या महिलेने मी असल्याचे सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले.

त्यानंतर शाहरुखच्या पत्नीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच पोलिस आत घुसले. पोलीस आल्याचे पाहताच शाहरुखने गावठी पिस्टल पोलिसांवर ताणले . शाहरुखने जवळ झोपलेल्या लहान मुलाला ढाल बनवण्याचा प्रयत्न करत पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर मात्र, पोलिसांनी लहान मुलाचा बचाव करत शाहरुखच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी थेट शाहरुखच्या पायाला लागली. मात्र तरीसुद्धा शाहरुखने त्याच्याजवळची गावठी पिस्टल पोलिसांच्या दिशेने रोखली होती. त्यानंतर मात्र पोलिसांनी पुन्हा गोळ्या झाडल्या आणि शाहरुख जखमी झाला.

तातडीने त्याला सोलापुरातील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान शाहरुखला नेमक्या किती गोळ्या लागल्या याची माहिती अद्याप समोर आली नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच त्याला नेमक्या किती गोळ्या लागल्या याचा तपशील समोर येईल.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २३, रा. सय्यद नगर, मोहम्मदवाडी रोड, हडपसर, पुणे) याच्यावर पुण्यात अनेक गुन्ह्याची नोंद होती. शाहरूखला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. शाहरूखने पोलिसांपासून वाचण्यासाठी पुण्यातून पळ काढला. व तो थेट मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील त्याचे नातेवाईक राजू अहमद शेख याच्या नरुटे वस्ती येथील घरात दुसऱ्या मजल्यात आश्रयासाठी आला.

गेल्या १५ दिवसांपासून तो त्या ठिकाणी राहत होता. दरम्यान, पुणे पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत त्याच्या मागावरच होते. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे मोहोळ पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यासाठी आज पहाटे ३. ३० च्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर सापळा लावला. एका खोलीत कुटुंबासमवेत लपून बसलेल्या शाहरुख शेखला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांच्या दिशेने त्याच्या हातातील गावठी पिस्टलने फायर केली.

पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या सर्विस पिस्टल मधून स्वरक्षणासाठी शाहरुखच्या पायावर गोळी झाडली. त्यात तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. अट्टल गुन्हेगार शाहरुखचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याच्या घटनेने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आदींसह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान पोलिसांच्या फॉरेन्सिक टीम ने ही घटनास्थळी भेट देत आणखी तपासासाठी वेगवेगळे नमुने घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT