महर्षीनगर: गंगाधाम चौकात गेल्या तीन दिवसांपासून ड्रेनेजचे काम सुरू असून, खोदलेल्या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. बॅरिकेड, धोक्याचे फलक आणि रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्थाही नसल्याने पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. येरवड्यात ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला जाग आलेली नसल्याचे चित्र आहे.
गंगाधाम चौक हा वर्दळीचा परिसर असून, येथून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. चौकातच ड्रेनेजच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र, त्याच्या बाजूला सुरक्षेसाठी बॅरिकेड लावणे, धोक्याचे फलक उभारणे किंवा रात्रीच्या वेळी दिवे लावणे यांसारख्या उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना खड्ड्याचा अंदाज येणे कठीण होत आहे.
या मार्गावरून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला ये-जा करतात. खड्ड्याभोवती सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. येरवड्यातील दुर्घटनेतून महापालिका प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. प्रभाग क्रमांक २० आणि २१ च्या मध्यभागी सुरू असलेल्या या कामाकडे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
संबंधित ठेकेदारावर कारवाई करून खड्ड्याभोवती तातडीने बॅरिकेड, धोक्याचे फलक आणि रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त शीतल वाकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
गंगाधाम चौकातील ड्रेनेजच्या कामात सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी होणे आवश्यक आहे. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत कळविण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे.श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका