Gun Firing Pudhari
पुणे

Pune gang attack case: गोळीबार करणारे आंदेकर टोळीचे पंटर; एकवीरा देवीच्या डोंगरावरून घेतले गुन्हे शाखेने ताब्यात

तीन दिवस केली रेकी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुनातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ अक्षय याच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करणाऱ्या आंदेकर टोळीतील पंटरांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा एकवीरा देवीच्या डोंगरावरून पकडले.

आरोपींनी तीन दिवस अक्षय मस्के हा सकाळी किती वाजता रिक्षा घेऊन बाहेर पडतो. तो कुठे कुठे थांबतो, दुपारी तो कुठे फिरतो. तसेच, रात्री केव्हा घरी परततो, याची रेकी केली आहे. त्यांना तो सकाळी बालाजीनगर परिसरातील रिक्षाथांब्यावर थांबल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तेथे अक्षयवर गोळीबार करून कोयत्याने वार करत हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आफ्ताफ शरीफ सय्यद (वय 22, रा. भाग्यदेवनगर, कोंढवा खुर्द), ऋषीप्रसाद मोहन आंबट (वय 21, रा. हमाल तालीम, नाना पेठ), आवेज अशपाक शेख (वय 26, रा. गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय 19, रा. भवानी पेठ, पालखी विठोबा चौक), अमन फारूक बागवाले (वय 21, रा. गोल्डन ग््रेास, भवानी पेठ) अशी गुन्हेगारांची नावे आहेत, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

अक्षय मस्के याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याची पत्नी करुणा अक्षय मस्के (वय 22, रा. स्वामी समर्थनगर, आंबेगाव पठार) यांनी सहकारनगर पोलिसांत फिर्याद दिली.वनराज आंदेकरचा खून सोमनाथ गायकवाड टोळीने केला होता. टोळीयुद्धातून हा खून झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती.

आवेज शेख मोक्कातील आरोपी

कोंढवा भागात गोळीबार प्रकरणात कृष्णा आंदेकरसह टोळीवर मोक्का कारवाई केली होती. त्यामध्ये आवेज शेखचा सहभाग होता. तो मोक्कातून जामिनावर बाहेर आला असून, आंदेकर टोळीचा नंबरकारी (सदस्य) आहे. कृष्णा आंदेकरने या आरोपींना पिस्तूल पुरवले होते, तर आवेजसोबत इतर अटक केलेली मुले ही कृष्णा व स्वराजसोबत असत, या मुलांना घेऊन आवेजने या खुनाचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

आरोपींना 27 मेपर्यंत पोलिस कोठडी

वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून आरोपींनी कट रचून आरोपीच्या भावावर कोयत्याने वार आणि पिस्तुलातून गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पाच जणांना अटक करत त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सकळे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींपैकी बागवाले, टेमगिरे, शेख, सय्यदवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि वाहने जप्त करायची आहेत. त्यांनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष जाधव आणि सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT