Dhananjay Kulkarni Vidyanand Bapat Pudhari
पुणे

Vidyanand Bapat: 'आमच्या भावना दुखावल्या', बापटांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार म्हणणारे धनंजय कुलकर्णी कोण? वाद पेटला

Dhananjay Kulkarni Vidyanand Bapat: पुण्यातील गणेशोत्सव आणि डीजेच्या कर्कश आवाजाच्या मुद्द्यावरून विद्यानंद बापट यांच्या भूमिकेवर धनंजय कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे.

Rahul Shelke

Dhananjay Kulkarni Vidyanand Bapat: गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाला विरोध करणारे विद्यानंद बापट सध्या पुण्यात चर्चेत आहेत. मात्र, गणेशोत्सवातील मंडप, मिरवणुकीचे मार्ग आणि उत्सवाच्या आयोजनाबाबत बापट यांनी घेतलेल्या भूमिकेला काही जणांकडून विरोध होत आहे.

याच पार्श्वभूमीवर एसएनडीटी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक आणि विद्यार्थी चळवळीत काम केलेले धनंजय कुलकर्णी यांनी बापट यांच्या काही भूमिकांवर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, “विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधातील भूमिकेला आमचा विरोध नाही. उलट कर्कश आवाजातील डीजेला आमचा विरोध आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी,” अशी आमची भूमिका आहे.

मात्र, बापट यांनी गणेशोत्सवाशी संबंधित इतर काही मुद्दे उपस्थित केले आहेत, त्याला आमचा आक्षेप असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. मिरवणूक शहराबाहेरील रस्त्यांवरून न्यावी, अशा प्रकारच्या मागण्यांना आपला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गणेशोत्सवाशी संबंधित मुद्दे योग्य पद्धतीने मांडायला हवेत’

कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, गणेशोत्सवाच्या आयोजनात बदल सुचवायचे असतील तर त्यासाठी योग्य प्रक्रिया अवलंबणे गरजेचे आहे. “गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी असे मुद्दे उपस्थित करून त्यात बदल होऊ शकत नाही. समाजात अस्वस्थता निर्माण करणे हा परिवर्तनाचा मार्ग नाही,” असे ते म्हणाले.

बापट यांनी घेतलेल्या भूमिकेवर कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय संस्कृतीचा संदर्भ देताना बालविवाह, केशवपन यांसारख्या जुन्या कुप्रथांचा उल्लेख करण्याची आवश्यकता नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रथांचा गणेशोत्सवाशी थेट संबंध नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘सोशल मीडियावरील समर्थन केवळ डीजेच्या मुद्द्यावर’

विद्यानंद बापट यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचा दावा केला जात असला, तरी हे समर्थन मुख्यतः डीजेच्या मुद्द्यावर आहे, असा दावा कुलकर्णी यांनी केला.

“डीजेच्या कर्कश आवाजाच्या मुद्द्यावर सर्वसामान्य जनता त्यांच्या भूमिकेसोबत आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत त्यांनी मांडलेल्या इतर मुद्द्यांवर हिंदू समाज त्यांच्यासोबत आहे, असे आम्हाला वाटत नाही,” असे कुलकर्णी म्हणाले.

‘बापट हिंदूविरोधी असल्याचे त्यांच्या कृतीतून सिद्ध होते’

विद्यानंद बापट यांच्यावर हिंदूविरोधी असल्याचा आरोपही कुलकर्णी यांनी केला. बापट ज्या लोकांसोबत वावरतात, त्यांच्या राजकीय-सामाजिक भूमिकांचा संदर्भ देत त्यांनी बापट यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

त्याचवेळी, एखादी व्यक्ती समाजवादी किंवा निधर्मी विचारांची असणे याला हरकत नसल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. “एखाद्याचा देवावर विश्वास नसला तरी आम्हाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मात्र, गणेशोत्सवात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर त्यासाठी योग्य पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

‘उद्या पोलिसांत तक्रार दाखल करणार’

दरम्यान, विद्यानंद बापट यांच्या काही वक्तव्यांमुळे आपल्या भावना दुखावल्या असल्याचा दावा करत धनंजय कुलकर्णी यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

“आमच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत मी उद्या पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांच्याकडे मी तक्रार दाखल करणार आहे,” अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

त्यामुळे डीजेच्या आवाजाचा मुद्दा, गणेशोत्सवाच्या आयोजनावरील मतभेद आणि आता प्रस्तावित पोलिस तक्रार यामुळे विद्यानंद बापट यांच्याविरोधातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT