शंकर कवडे
पुणे: गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शहरातील वाहतुकीचे नियोजन मात्र कोलमडू लागले आहे. आधी मंडपांनी रस्ते व्यापले, आता भव्य मूर्ती आणि जिवंत देखावेही थेट मांडवाबाहेर म्हणजे रस्त्यावर आले आहेत. त्यात 'स्थिर वादना'च्या नावाखाली काही ठिकाणी रस्ते आणि चौकही अडविले जात आहेत. गणेशोत्सवामुळे आधीच मध्यवर्ती भागातील मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवर वळविण्यात आली असताना तेथेही मंडळांच्या उपक्रमांमुळे अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, मंडप रस्त्यावर, देखावा रस्त्यावर, वादन रस्त्यावर आणि गर्दीही रस्त्यावर, 'मग आम्ही जायचे तरी कुठून?' असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहराच्या बुधवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ तसेच शुक्रवार पेठ असलेल्या मध्यवर्ती भागात देखावे पाहण्यासाठी सायंकाळनंतर मोठी गर्दी होत आहे. हा ताण लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. मात्र, पर्यायी मार्ग असलेल्या टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता परिसरातील मंडप, भाविकांची गर्दी आणि विविध कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पूर्वी मंडळाचा मंडप अथवा स्टेज रस्त्याच्या कडेला असायचा आणि भाविक तेथे थांबून देखावा पाहायचे. आता काही ठिकाणी देखाव्याचा विस्तारच रस्त्यावर झाला आहे.
टिळक चौकासह सोमवार पेठेत मोठ्या मूर्ती, जिवंत देखाव्यातील कलाकार रस्त्यावर येत आहेत. तर, रास्ता पेठ, लष्कर परिसरात काही ठिकाणी केबलच्या साहाय्याने रस्त्याच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला हनुमान, रावण तसेच विमान आदी पात्र तसेच प्रतिकृती वाहून नेल्या जात आहेत. त्यामुळे देखावा पाहण्यासाठी नागरिक रस्त्यावरच थांबत असून वाहनांसाठी जागाच उरत नसल्याचे चित्र आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांसह मंडळांचे स्वयंसेवकही पुरेशा संख्येने दिसत नसल्याने परिस्थिती आणखी बिकट होत आहे. पादचारी, दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी एकाच अरुंद जागेतून वाट काढत आहेत. गणेश विसर्जन शुक्रवारी होणार असल्याने उर्वरित दोन दिवस देखावे पाहण्यासाठी गर्दी आणखी वाढणार आहे. त्यामुळे पोलिस आणि मंडळांनी समन्वय साधून किमान वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करावे, अशी अपेक्षा आहे.
वीस मिनिटांचा देखावा; कोंडी मात्र त्याहून अधिक!
जिवंत देखावा सुरू होताच नागरिक रस्त्यावर थांबतात आणि वाहतूक ठप्प होते. देखावा दहा ते वीस मिनिटांचा असला तरी मागे लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे वाहतूक पूर्ववत होण्यास त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. तोपर्यंत पुढील खेळाची वेळ होते आणि पुन्हा गर्दी रस्त्यावर येते. देखावा आकर्षक करण्याबरोबरच तो पाहणाऱ्यांसाठी जागा, वाहनांना मार्ग आणि प्रवेश-बाहेर पडण्याचे नियोजनही आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
'स्थिर वादन' म्हणजे रस्ता बंद करण्याची परवानगी?
गणेशोत्सवासाठी प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक आधीच पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे. त्याच मार्गांवर ढोल-ताशा अथवा अन्य वाद्यांच्या 'स्थिर वादना'साठी काही ठिकाणी रस्ते आणि चौकांचा मोठा भाग व्यापला जात आहे. मुख्य मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविल्यानंतर तोच मार्ग अशा कार्यक्रमांमुळे अडला जात असल्याने रस्ता तसेच चौकात दुहेरी कोंडी होत आहे. उत्सवाचा आनंद कायम ठेवतानाच सार्वजनिक रस्ता पूर्णपणे रोखला जाणार नाही, याची जबाबदारी मंडळे आणि पोलिसांनी घेण्याची गरज आहे.