Pune Road Diversion Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Traffic Changes: पुण्यात गणेशमूर्ती खरेदीसाठी वाहतूक बदल! डेंगळे पूल, शिवाजी रस्ता अन् केशवनगरमध्ये मार्ग बंद

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर १३-१४ सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पीएमपी बसचे मार्गही वळवले, वाहनचालकांसाठी पार्किंगची व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच शिवाजीनगर भागातील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, मुंढव्यातील केशवनगर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टाॅल लावले आहेत.

या भागातील वाहतूक व्यवस्थेत रविवारी (१३ सप्टेंबर), तसेच सोमवारी (१४ सप्टेंबर) वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीस बंद असणार आहे. वाहनांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक या मार्गाने जावे.

जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने कुंभारवेसकडे जावे. सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ केंद्र परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवारी (१४ सप्टेंबर) मध्य भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरुज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला चित्रपटगृहसमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते.

या पार्श्वभूमीवर सोमवारी (१४ सप्टेंबर) या भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्याची वळविण्यात आली आहे. शिवाजी नगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.

पार्किंग व्यवस्था कुठे आहे?

  • कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा

  • कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा

  • संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा

  • टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता

  • मंडईतील वाहनतळ

  • छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT