पुणे: आमच्या तीन फुटांच्या गणेशासह रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आजची नाही बरं का... कित्येक पिढ्यांनी याच मूर्तीसमोर हात जोडलेत. त्या काळी पीओपी, फायबर नव्हतं. कुठे लाकडी रांधा, कुठे कागदाचा लगदा, तर कुठे शाडूपासून मूर्ती घडविल्या जायच्या. विसर्जनही प्रतीकात्मक आणि मूर्ती पुन्हा पुढच्या वर्षासाठी जपून ठेवायची. आता काळ बदलला अन् फायबरच्या मूर्ती आल्या; पण एकच मूर्ती वर्षानुवर्षे जपण्याची पुण्याची परंपरा मात्र कायम आहे... शहरातील १३० वर्षे पूर्ण केलेल्या सराफ सुवर्णकार गणपती ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय देवकर पुण्याच्या बाप्पाचा हा प्रवास सांगत होते. त्याच्या या शब्दांतूनच पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे वेगळेपण अधोरेखित होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर आज सर्वत्र होत असला, तरी पुणेकरांनी पर्यायी माध्यम आणि मूर्तींच्या पुनर्वापराची वाट अनेक वर्षांपूर्वीच धरली होती. मोठ्या शाडू मूर्तींचे वजन, वाहतूक आणि विसर्जनातील अडचणी लक्षात घेऊन तत्कालीन मूर्तिकारांनी लाकडी रांधा, कागदी लगदा आणि खळ यांचा वापर करून हलक्या मूर्ती घडविल्या. काळाच्या ओघात पुनर्वापरयोग्य फायबरच्या मूर्तींचा पर्याय पुढे आला.
वजनाने हलक्या आणि वर्षानुवर्षे जतन करता येत असल्याने अनेक मंडळांनी तो स्वीकारला. प्रतीकात्मक विसर्जनानंतर मूर्ती सुरक्षित ठेवून पुढील वर्षी पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे साहित्य, खर्च आणि विसर्जनाचा ताणही कमी होतो. दरम्यान, आजही बहुतांश मंडळांकडून जुन्या लाकडी भुसा, कागदापासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. तर, काहींकडून उत्सवमूर्ती म्हणून फायबरच्या मूर्तीची पूजा करण्यात येते. माध्यम बदलले; मात्र पुण्याच्या बाप्पाची भव्यता आणि पर्यावरणभान कायम राहिल्याचे शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती पाहिल्यानंतर दिसून येते.
...या मंडळाच्या मूर्ती आजही विराजमान
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
श्री शारदा गजानन मार्केट यार्ड
पांगुळ आळी मंडळ
अखिल मंडई मंडळ
सराफ सुवर्णकार गणपती ट्रस्ट मंडळ
राजर्षी शाहू चौक गणेशोत्सव मंडळ
आमच्या मंडळाची मूळ गणेशमूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली असून, ही परंपरा आम्ही आजही जपली आहे. त्याचबरोबर उत्सवासाठी फायबरची मूर्ती स्वीकारली आहे. गणेशोत्सवाची भव्यता आणि धार्मिक भावना जपत पर्यावरणाचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कागदी लगदा आणि पुनर्वापर करता येणारे फायबर अशा दोन्ही माध्यमांचा वापर करून आम्ही परंपरा आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.सागर भोसले, माजी अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळ
आमच्या मंडळाची मूळ गणेशमूर्ती शाडूपासून तयार केलेली आहे, तर उत्सवमूर्ती फायबरची आहे. मोठ्या उत्सवमूर्तीचे दर वर्षी विसर्जन करण्याऐवजी तिचा पुनर्वापर करणे हा पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला पर्याय ठरतो. श्रद्धा आणि परंपरेला कोणताही धक्का न लावता बदलत्या काळानुसार पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारता येतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही याबाबत पुढाकार घेतल्यास पर्यावरणावरील भार कमी करण्यास निश्चित मदत होईल.आकाश मुसळे, सदस्य, राजर्षी शाहू चौक गणेशोत्सव मंडळ