Ganeshotsav Medical Centre Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Medical Hirkani Kaksh Tender: गणेशोत्सवातील वैद्यकीय, हिरकणी कक्षांसाठी महापालिकेचा १.०६ कोटींचा खर्च; विसर्जनाच्या चार दिवस आधी निविदा

२१ सप्टेंबरला निविदा उघडणार, कामाचा कालावधी २० दिवस; नगरसेवकांच्या निधीतून रक्कम उपलब्ध केल्याने प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवासाठी वैद्यकीय, हिरकणी कक्षांच्या नावाखाली महापालिकेकडून तब्बल १ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गणेश विसर्जन मिरवणुकीला अवघे चार दिवस शिल्लक असताना म्हणजेच दि. २१ सप्टेंबरला या निविदा उघडल्या जाणार आहेत. दि. २५ सप्टेंबरला विसर्जन असल्याने निविदा प्रक्रियेच्या वेळेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामांचा कालावधी २० दिवसांचा ठेवण्यात आला आहे.

नगरसेवकांच्या निधीतून वर्गीकरणाद्वारे रक्कम उपलब्ध करून देण्यात आल्याने न्यायालयीन निर्देशांनंतर राज्य शासनाने सार्वजनिक उत्सवांवरील खर्चाबाबत घातलेल्या निर्बंधातून 'पळवाट' काढली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. महापालिकेच्या झोन क्रमांक पाचच्या वतीने दि. १२ सप्टेंबरला यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली. वैद्यकीय कक्ष आणि हिरकणी कक्ष उभारण्यासाठी प्रत्येकी २१ लाख १८ हजार ५०० रुपये किमतीच्या पाच स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदा दि. २१ सप्टेंबरला उघडण्यात येणार आहेत.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असलेल्या लक्ष्मी, कुमठेकर, टिळक आणि केळकर रस्त्यांवर महापालिकेच्या तसेच शैक्षणिक संस्थांच्या अनेक इमारती उपलब्ध आहेत. विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, कलावती मावळे दवाखाना, हुजूरपागा, नू.म.वि. शाळा, गोखले हॉल, ट्रेनिंग कॉलेज, हिराबाग येथील क्षेत्रीय कार्यालय, एस. पी. कॉलेज आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या वर्गखोल्यांचा यासाठी वापर करता येऊ शकतो.

त्यामुळे केवळ एका दिवसाच्या गरजेसाठी लाखो रुपये खर्च करण्याऐवजी उपलब्ध जागांचा वापर करावा, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक उत्सवांवरील खर्चावर निर्बंध आणले आहेत. असे असताना नगरसेवकांच्या निधीतून वर्गीकरणाद्वारे रक्कम उपलब्ध करून घेऊन निविदा काढण्यात आल्याने या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नगरसेवकांच्या निधीतून रक्कम

विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या भवन विभागाचे कनिष्ठ अभियंता कमलेश जाधव यांनी सांगितले की, वैद्यकीय आणि हिरकणी कक्षांसाठी नगरसेवकांच्या निधीतून वर्गीकरणाद्वारे रक्कम उपलब्ध झाली आहे. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या असून, जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, निश्चित केलेल्या जागांची यादी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही.

'माहिती घेऊन निर्णय'

अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले की, या निविदा उपायुक्त स्तरावर काढण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.

पाच निविदांचा खर्च

पाच स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून, प्रत्येक निविदेची अंदाजित किंमत २१ लाख १८ हजार ५०० रुपये आहे. सर्व निविदांची एकत्रित किंमत सुमारे १ कोटी ६ लाख रुपये आहे. कामाचा कालावधी २० दिवसांचा नमूद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT