पुणे: लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने पुण्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत विविध बाजारपेठांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. यंदाही पुण्यातील बाजारपेठांमध्ये सुमारे दीड हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भक्तांच्या घरी सुखकर्ता म्हणून विराजमान होणारा गणराया व्यावसायिक, कारागीर आणि छोट्या विक्रेत्यांसाठी 'अर्थकर्ता' ठरणार आहे.
झेंडू, शेवंती गुलछडीला मागणी
फुलबाजारात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यासह सोलापूर, वाई, सातारा आदी भागांतून झेंडूची, तर कर्नाटकातून मारिगोल्ड जातीच्या शेवंतीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. महिनाभरापासून तुलनेने कमी असलेले फुलांचे भाव मागणी वाढताच वधारले आहेत. बाजारात दाखल होणाऱ्या फुलांच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने झेंडू आणि शेवंतीच्या भावात २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. गुलछडीचे भाव तर दुपटीपर्यंत वाढले आहेत, असे पुणे बाजार समितीचे फुलबाजार विभागप्रमुख संतोष कुंभारकर यांनी सांगितले आहे.
दूर्वा, पत्री, केवडा, कमळासाठी गर्दी
गणरायाला प्रिय असलेल्या दूर्वांसह प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी लागणारी पत्री, केवडा, शमी, कमळ आणि विड्याची पाने खरेदीसाठी गुलटेकडी मार्केट यार्ड तसेच मंडई परिसरात नागरिकांची गर्दी वाढली आहे. विक्रेत्यांकडून पत्रीची गड्डी २० रुपये, दूर्वा २५ रुपये, विड्याची पाने २० रुपयांना १२ नग, केवडा ३० ते १०० रुपये, तर कमळाची २० ते ४० रुपयांना विक्री होत आहे.
उकडीपासून ‘रोझ-गुलकंद’पर्यंत मोदकांची रेलचेल
गणरायाच्या आगमनानिमित्त घरगुती विक्रेते, महिला बचत गट आणि मिठाई व्यावसायिकांकडे उकडीच्या मोदकांची आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. बाजारात एका उकडीच्या मोदकाची ३० ते ५० रुपयांना विक्री होत आहे, तर मावा व विविध फ्लेवर्सचे मोदक ७५० ते १,००० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत.
पूजेसह प्रसादासाठी फळांची खरेदी
गणरायाच्या प्रतिष्ठापनेदरम्यान पूजेसाठी मांडण्यात येणाऱ्या फळांमुळे केळी, सफरचंद, पेरू, चिकू, सीताफळ, डाळिंब आदी फळांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सवात प्रसादासाठीही सफरचंद आणि केळीला मागणी टिकून राहणार आहे. राज्यासह परराज्यांतून मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत असून, देशी सफरचंदही बाजारात दाखल झाले आहेत.
चांदीच्या दूर्वा, मोदक अन् मुकुटाला पसंती
लाडक्या गणरायाला सोन्या-चांदीचे अलंकार वाहण्याची परंपरा यंदाही कायम आहे. चांदीचा दर २ लाख २९ हजार ९०० रुपयांवर (जीएसटी वगळून) पोहचला असतानाही गणरायासाठी चांदीचे अलंकार खरेदी करण्याकडे भक्तांचा कल कायम आहे. कारागिरांनी आकर्षक डिझाइनमध्ये मोदक, रत्नजडीत मुकुट, तोडे, जानवे, मूषक, दूर्वाहार, कडे, बाजूबंद, पान-सुपारी, जास्वंदीचा हार, मोत्यांचा हार, त्रिशूळ, सोंडपट्टी, शेला, भीकबाळी, छत्री आणि उपरणे अशी विविध आभूषणे तयार केली आहेत.
दररोज तीन लाखांहून अधिक नारळांची आवक
पूजा, धार्मिक विधी आणि मोदकांसाठी नारळाला मोठी मागणी असते. त्यासाठी मार्केट यार्डात दररोज तीन ते चार हजार पोत्यांमधून तीन लाखांहून अधिक नारळ दाखल होत आहेत. धार्मिक विधी आणि तोरणासाठी तामिळनाडूच्या वाणी अंबाडी भागातून येणाऱ्या नव्या नारळाला मागणी आहे, तर मोदकांसाठी साफसोल आणि मद्रास नारळाला ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारात एका नारळाची ५० ते ८० रुपयांपर्यंत विक्री होण्याचा अंदाज नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी वर्तविला.
चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असली, तरी गणरायासाठी चांदीचे अलंकार खरेदी करण्याचा भक्तांचा उत्साह कायम आहे. यंदा चांदीच्या दूर्वांना मोठी पसंती मिळत आहे. वजनाने हलके आणि आकर्षक डिझाइनचे अलंकार ग्राहकांकडून अधिक निवडले जात आहेत. गणेशोत्सवामुळे सराफा बाजारातील चांदीच्या वस्तूंच्या विक्रीला चांगली चालना मिळण्याची अपेक्षा आहे.श्रीप्रसाद पंडित, न्यू श्रीकृपा ज्वेलर्स, बिबवेवाडी
गणेशोत्सवासाठी उकडीच्या मोदकांची आगाऊ नोंदणी सुरू झाली असून, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक उकडी आणि माव्याच्या मोदकांबरोबरच चॉकलेट, केशर-मावा, पान, रसमलाई, रोझ-गुलकंद, ड्रायफ्रुट अशा विविध फ्लेवर्सच्या मोदकांना तरुणांकडून पसंती मिळत आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी तसेच पुढील दहा दिवसांत मोदकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे.अभिजित साळुंखे, मिठाई विक्रेते. नारायण पेठ