Ganesh Visarjan Ghats Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Immersion: गणरायाच्या स्वागतासाठी पुणे सज्ज! विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी

कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या अन् निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था; पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पुणे महापालिकेचा विशेष भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. घराघरांत गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच सार्वजनिक गणेश मंडळांनीही उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात नेली आहे. पुणेकरांच्या लाडक्या गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनही सज्ज झाले असून, गणेशमूर्तींचे विसर्जन, निर्माल्य संकलन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेवर प्रशासनाने भर दिला आहे. नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांऐवजी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कृत्रिम विसर्जन हौद वापरावा

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले आहे. दि. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या गणेशोत्सवात नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जित न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पालिकेचे प्रयत्न

पुण्यात गणेशमूर्तींचे दीड दिवस, पाचवा, सातवा दिवस तसेच अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणावर विसर्जन केले जाते. या विविध विसर्जनाच्या दिवसांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले आहे. विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य संकलन केंद्रे तसेच मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली असून, विसर्जनाच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन करतानाच पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत.

निर्माल्य संकलनासाठी २७४ ठिकाणी ३२८ केंद्रे

महापालिकेच्या नियोजनानुसार शहरात ३७ बांधलेले विसर्जन हौद असून, त्यापैकी ३५ ठिकाणी हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ३८ ठिकाणी एकूण ६९ हौदांची अतिरिक्त व्यवस्था आहे. याशिवाय २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निर्माल्य संकलनासाठी २७४ ठिकाणी ३२८ केंद्रे उभारण्यात आली असून, अन्य माध्यमांतूनही संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देताना विसर्जित गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन व पुनर्वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विसर्जित झालेल्या मूर्ती वाघोली येथील खाणीमध्ये पुनर्विसर्जित करण्यात येतात.

मागील गणेशोत्सवात महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाडू माती संकलित करून तिचा पुनर्वापर करण्यात आला. २०२५ मध्ये तब्बल ३९ टन शाडू माती संकलित करण्यात आली. तसेच निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मितीचा उपक्रमही राबविण्यात आला. २०२५च्या गणेशोत्सवात १ लाख १३ हजार १३६ मूर्ती बांधलेल्या हौदांत, ३ लाख ६२ हजार ३१९ मूर्ती लोखंडी टाक्यांत, तर १ लाख ७८ हजार ९५५ मूर्ती संकलन केंद्रांवर विसर्जित करण्यात आल्या. एकूण ६ लाख ५४ हजार ४१० मूर्तींचे विसर्जन झाले. तर ९२३३९८ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले होते. गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सोईसाठी ५५४ पोर्टेबल टॉयलेटचीही व्यवस्था करण्यात आली होती.

पालिकेने विसर्जनासाठी केलेली तयारी

  • नदीपात्र : ३७ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था

  • घाट : ३५ घाटांवर विसर्जनाची व्यवस्था

  • बांधलेले कृत्रिम हौद : ३८ ठिकाणी, ६९ हौद

  • लोखंडी टाक्या : २८१ ठिकाणी, ६४८ टाक्या

  • तलाव : ४ विहिरी : ७

  • कॅनॉल : ४१

  • निर्माल्य कलश/कंटेनर : २७४ ठिकाणी, ३२८ कलश

  • मूर्तिसंकलन/दानकेंद्रे : २४१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT