पुणे: पुणेकरांनो, गणेशोत्सव मिरवणुकीत एखाद्या रथावर आठपेक्षा अधिक स्पीकरचे बॉक्स दिसल्यास ते नक्कीच मर्यादेचे उल्लंघन समजा. ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी चार टॉप आणि चार बेस, अशा एकूण आठ स्पीकर्सची मर्यादा निश्चित केली आहे. डेसिबलच्या नियमांचे पालन करून मिरवणुकीसाठी आवश्यक ध्वनिक्षेपण करण्यास ही यंत्रणा पुरेशी असल्याचे साउंड इलेक्ट्रिक जनसेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
चार टॉप आणि चार बेसच्या यंत्रणेतून निघणारा आवाज सुमारे ५० फुटांपर्यंत स्पष्टपणे ऐकू येऊ शकेल. त्यानंतर १०० फुटांपर्यंत आवाजाची तीव्रता टप्प्याटप्प्याने कमी होत जाईल. त्यामुळे मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची गरज पूर्ण होण्याबरोबरच भाविक आणि नागरिकांना त्रास होईल इतका कर्कश आवाज निर्माण होण्याची शक्यताही कमी होईल, असे मत साउंड इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील तज्ज्ञ सचिन नाईक यांनी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
या यंत्रणेबद्दल बोलताना ते म्हणाले, हाय फ्रीक्वेन्सी (हॉर्न), मिड फ्रीक्वेन्सी आणि लो फ्रीक्वेन्सी स्पीकर या तिन्हींचा सुयोग्य समतोलाद्वारे उपस्थित समुदायापर्यंत योग्य आवाज पोहचविला जातो. बंद सभागृहात विविध ठिकाणच्या आवाजाच्या पातळ्या पाहून किती स्पीकर व किती बेस गरजेचे आहेत, हे निश्चित करता येते. मात्र, मैदानावर वा रस्त्यावर असा समतोल साधताना मोठी कसरत करावी लागते. त्यातूनच तिन्ही फ्रीक्वेन्सीचा समतोल बिघडून आवाजाची गुणवत्ता खालावते आणि तो कर्णकर्कश होतो. त्या परिसरातील, रहदारीच्या रस्त्यावरील ध्वनीची पातळी आणि वातावरण लक्षात घेऊन ध्वनिक्षेपणाची फ्रीक्वेन्सी निश्चित करावी लागते.
विविध नामांकित कंपन्यांच्या (ब्रँडेड) साउंंड सिस्टिममध्ये हाय, मिड आणि लो फ्रीक्वेन्सीचा अचूक समतोल साधलेला असतो. त्यामुळे त्यातून तुलनेने सुस्पष्ट आवाज मिळतो. अलिकडे काही भारतीय उत्पादक कंपन्यांनीही अशा यंत्रणा उपलब्ध केल्या आहेत. मंडळांनी त्यांचा वापर केल्यास ध्वनिमर्यादेचे पालन करून उत्सव साजरा करता येणे सहजशक्य होईल, असेही ते म्हणाले. प्लाझ्मा सिस्टिममध्ये मोठ्या आवाजासाठी ८ ते १२ किंवा त्याहीपेक्षा अधिक हाय फ्रीक्वेन्सी आणि तेवढ्याच संख्येने मिड व लो फ्रीक्वेन्सी स्पीकर वापरले जातात. परिणामी, आवाजाची तीव्रता वाढून तो कर्कश आणि हादरवून टाकणारा ठरतो. डेसिबलच्या मर्यादेचेही त्यामुळे उल्लंघन होते. त्यामुळे या सिस्टिमवर घालण्यात आलेली मर्यादा योग्यच असल्याचेही मत या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.
...तर ध्वनिक्षेपण सुसह्य
हाय फ्रईक्वेन्सी स्पीकरमधून घुंगरू, घंटा अशा वाद्यांचे आवाज येतात.
मिड फ्रीक्वेन्सी स्पीकर व्होकल आवाज प्रक्षेपित करतो.
लो फ्रीक्वेन्सी स्पीकर तबला, डग्गा अशा वाद्यांचे आवाज प्रक्षेपित करतात.
या तिन्हींचा समतोल साधला तर ते ध्वनिक्षेपण सुसह्य होते.