Fever Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Infection Risk: गणेशोत्सवाच्या गर्दीत संसर्गाचा धोका; पुण्यात डेंग्यू-चिकुनगुनियासह फ्लूचे रुग्ण वाढले

दोन महिन्यांत डेंग्यू-चिकुनगुनियाचे ५५० हून अधिक रुग्ण; लहान मुलांना गर्दीत नेणे टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात सर्दी, खोकला, ताप आणि फ्लूसह डेंग्यू, चिकुनगुनिया, टायफॉईडचे रुग्ण वाढत असताना गणेशोत्सवातील गर्दीमुळे संसर्ग पसरण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली. विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचा अधिक धोका असून, गर्दीत घेऊन जाणे टाळावे, असेही तज्ज्ञांनी सुचवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार दोन महिन्यांत डेंग्यू आणि चिकनगुनियाचे ५५० पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. हवामानबदलामुळे हिवताप आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. त्यातच गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांना सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये उकाडा, धूळ, धूर आणि गर्दीमुळे दम लागणे, चक्कर येणे, निर्जलीकरण, अशक्तपणा तसेच अचानक प्रकृती बिघडण्याच्या घटनाही घडू शकतात.

गर्दीत निर्माण होणारी उष्णता यामुळे डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, शिंकणे आणि खोकला वाढू शकतो, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. देखावे पाहण्यासाठी पालक लहान मुलांना सोबत घेऊन येतात. मात्र, मुलांना गर्दीत दीर्घकाळ उभे राहणे, उकाडा, आवाज, धूळ यामुळे सर्दी, खोकला, ताप, उलट्या, अशक्तपणा यांसारख्या संसर्गजन्य आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळावे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला.

बाहेरचे खाणे टाळा

गणपती देखावे पाहायला बाहेर पडल्यावर रस्त्यावर लागलेल्या हातगाड्यांवरील पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र, अशा ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याने हे अन्न सेवन केल्यास टायफॉईड व अतिसार यांसारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सवात बाहेरचे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले.

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांची लक्षणे असलेल्यांनी गर्दीत जाताना मास्कचा वापर करावा.
डॉ. राजेश कार्यकर्ते, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख, ससून रुग्णालय
सध्या फ्लूच्या आजाराची साथ सुरू आहे. लहान मुले या आजारांना बळी पडू शकतात. पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेताना मास्क घालणे, उघड्यावरील अन्नपदार्थ, अस्वच्छ पाणी न देणे यांसारख्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे.
डॉ. प्रमोद जोग, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT