Pune Ganesh Visarjan 2025
पुणे : पुण्यात गणेशोत्सव मिरवणूक रेंगाळलीच असून सकाळपासून टिळक चौकात पोलिसांकडून मंडळांना वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. लवकर पुढे न गेल्यास कारवाई करणार, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत 204 मंडळे टिळक चौकातून मार्गस्थ झाली आहेत.
यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक एक तास आधी सुरू झाली. मानाच्या पाचही गणपतींचे वेळेवर विसर्जन झाले असले तरी नंतर अनेक मंडळांमध्ये अंतर वाढल्यामुळे मिरवणुका रात्री उशिरापर्यंत रेंगाळल्या होत्या. त्यानंतर आजही मिरवणुका सुरूच आहेत. लक्ष्मी रस्त्याचा 35 वा मंडई गणपती पहाटे चार वाजता टिळक चौकात पोहोचला. म्हणजेच पहिल्या साडेअठरा तासात फक्त 35 मंडळे लक्ष्मी रस्त्यावरून गेली होती. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 179 मंडळे टिळक चौकातून मार्गस्थ झाली होती.
पुणे विसर्जन मिरवणुकीच्या अपडेट्स
> पावसाबरोबर डीजेचा दणदणाट आणखी वाढला असून दुपारी 2 वाजेपर्यंत 204 मंडळे मार्गस्थ झाली आहेत.
> अहिल्यादेवी मित्र मंडळाकडून टिळक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. 'महापालिकेने नारळ-शाल स्वतःकडे ठेवा 436 गुरूवार पेठ येथे कारवाई करून दाखवा,' 'अनधिकृत बांधकाम उठवा,' अशा घोषणा दिल्या.
> अकरा मारुती कोपरा मंडळाने अलका चौकात येताच विसर्जनाला पुढे मार्गस्थ न होता कुमठेकर मार्गे गणपती वळवला. पोलिसांनी सूचना देऊनही दुर्लक्ष करीत कुमठेकर मार्गे पुढे गेला आहे.
> अलका टॉकीज चौकात मंडळाकडून नियमांचे उल्लंघन. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी गर्दीत
फटाके फोडले. दगडी नागोबा गणेश मंडळाकडून भर चौकात फटाक्यांची आतषबाजी. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त.
> दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 179 मंडळे टिळक चौकातून मार्गस्थ.
> दुपारी 12 च्या सुमारास विसर्जन मिरवणूक मार्गावर पावसाची हजेरी. मंडळांची तारांबळ.
> सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण 155 मंडळांच्या गणपतींचे विसर्जन.
> गेल्यावर्षी विसर्जन मिरवणुक 30 तास चालली होती यावर्षी त्यापेक्षा जास्त वेळ लागणार 26 तास पेक्षा जास्त वेळ झाला तरीही अनेक मंडळ खोळंबली. (सकाळी अकरा वाजेपर्यंतची माहिती)
> लक्ष्मी रस्त्याने सकाळी दहा वाजेपर्यंत बेलबाग चौकातून 87 मंडळे गेली आणि 45 मंडळे शिल्लक होती.
> सकाळी साडे नऊपर्यंत १२९ मंडळे टिळक चौकातून पुढे गेली.
> दगडू शेठ हलवाई गणपती मिरवणूक शनिवारी संध्याकाळी 4 वाजता सुरू झाली. विसर्जन 9 वाजून 23 मिनिटांनी म्हणजेच 5 तास 23 मिनिटांनी झाले. तर भाऊ रंगारी गणपती 3 वाजून 21 मिनिटांनी अलका चौकात पोहचला त्यानंतर त्याचे विसर्जन झाले.
> शनिवारी मानाच्या गणपतींची मिरवणूक एकूण नऊ तास नऊ मिनिटे चालली.