पुणे: पुण्यात गणेशोत्सव आनंदात अन् उत्साहात साजरा झाला. दर वर्षीप्रमाणे यंदाही शहर आणि उपनरातील श्रीगणेश मंडळांनी उत्कृष्ट देखावे सादर केले... आता वेळ आहे या मंडळांना पारितोषिकाने गौरविण्याची... पुढारी माध्यम समूह आणि पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेल्या यंदाच्या गणाधीश नवोन्मेष स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता सहकारनगर येथील राजीव गांधी ई - लर्निंग स्कूलमध्ये रंगणार आहे.
यंदाच्या उत्सवात मंडळांनी सामाजिक विषयांसह सांस्कृतिक वारसा - परंपरा जपणारे देखावे सादर करीत पुणेकरांची दाद मिळविली. याच श्रीगणेश मंडळांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट देखावे, ऐतिहासिक देखावे, जिवंत देखावे (प्रसंग नाट्य), सामाजिक देखावे आणि उपनगरातील मंडळांचे देखावे अशा पाच विभागांमध्ये ही स्पर्धा रंगली. या विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांचा गौरव होणार असून, यानिमित्ताने नटरंग ॲकॅडमीच्या कलाकारांचा नृत्यसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुढारी माध्यम समूहाच्या वतीने गणाधीश नवोन्मेष स्पर्धा पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. यंदाही या स्पर्धेला श्रीगणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासह त्या माध्यमातून उत्कृष्ट सामाजिक, ऐतिहासिक आणि वेगळे देखावे सादर करणाऱ्या मंडळांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती.
आता पारितोषिकप्राप्त मंडळांना पारितोषिकांनी गौरविण्यासाठीचा सोहळा शनिवारी (दि. ३) आयोजित केला आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख, तसेच विश्वस्त पुनीत बालन, मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जतीन पांडे यांच्या नटरंग ॲकॅडमीचे कलाकार हे कार्यक्रमात संगीत, नृत्य, गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.
गणेशोत्सवात शहर आणि उपनगरातील श्रीगणेश मंडळांच्या देखाव्यांची पाहणी परीक्षकांनी केली आणि पाच विभागानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना पारितोषिकांनी गौरविले जाणार आहे. ॲड. शिरीष शिंदे, प्रसाद भडसावळे, दत्तात्रय वेताळ, राजेंद्र करंदीकर, मनीषा निंबाळकर, अनंतलक्ष्मी कैलासन, अनिल खोले, स्मिता खोले, विनायक सोनवणे आणि माणिक ओसवाल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
मंडळांच्या देखाव्यांमध्ये यंदाही परीक्षकांना नावीन्यपूर्ण संकल्पना पाहायला मिळाल्या. तसेच, सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवरही अनेक देखावे आधारित होते. श्रीगणेश मंडळांचा गौरव व्हावा, यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती.