पुणे: उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांची पावले फ्रुट स्टॉल, सरबत विक्रेते तसेच रसवंतिगृहाकडे वळू लागली आहेत. परिणामी, बाजारात कलिंगड, खरबूज या रसाळ फळांसह लिंबांना मागणी वाढली आहे. त्यातुलनेत कमी प्रमाणात माल बाजारात येत असल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपये, तर लिंबाच्या 15 किलोच्या गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाली आहे.
पाण्याचा तुटवडा, त्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या शक्यतेने बाजारात दर्जेदार डाळिंबाची आवक रोडावली आहे. परिणामी, डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर, पपईचे भावही किलोमागे दोन ते तीन रुपयांनी उतरले आहेत. मृगबहरातील संत्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने अहिल्यानगर येथून होणारी आवक घटली आहे. आवक-जावक कायम असल्याने संत्रीसह उर्वरित सर्व फळांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत.
फळबाजारात रविवारी (दि. 12) मोसंबीची 30 ते 40 टन, संत्रा 2 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबाची सुमारे 800 ते 900 गोणी, कलिंगड 40 ते 50 गाड्या, खरबूज 25 ते 30 टेम्पो, चिक्कू 2 हजार गोणी, पेरु 50 ते 100 क्रेट, अननस 6 ट्रक आणि कर्नाटक आंब्याची अडीच ते तीन हजार पेट्यांइतकी आवक झाली. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 400-2000, मोसंबी : (3 डझन) : 160-350, (4 डझन) : 50-130, संत्रा : (10 किलो) : 700-1700, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-200, आरक्ता : 10-50, गणेश : 10-30, कलिंगड : 5-12, खरबूज : 10-25, पपई : 5-15, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-400, अननस (1 डझन): 100-600, द्राक्षे : (15 किलो) : 700-1200, कर्नाटक : हापूस (3 ते 5 डझन) 1800-2300, (1 किलो) 140-180, पायरी (1 किलो) 70-100, लालबाग आणि बदाम (1 किलो) 60-80.