Watermelon Pudhari
पुणे

Pune Fruit Market Rates: गुलटेकडी फळबाजारात आवक वाढली; कलिंगड-खरबूज स्वस्त, लिंबू महाग

धूलिवंदन सुटी व रमजानच्या पार्श्वभूमीवर फळांची मोठी आवक; मागणीअभावी दर घसरले, लिंबाला उन्हामुळे चांगली मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 3) बाजाराला असलेली सुटी आणि मुस्लिम धर्मीयांच्या सुरू असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी सर्वच फळांची मोठी आवक झाली. त्यातुलनेत मागणी कमी राहिल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी घसरण झाली. तर, वातावरणात उष्णता वाढून चिकूचीही आवक वाढल्याचे चित्र बाजारात दिसून आले. मागणीअभावी दर दहा ते पंधरा टक्क्यांनी उतरल्याचे सांगण्यात आले.

बाजारात डाळिंबांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून अपरिपक्व डाळिंबांची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. परिणामी, त्याच्या तुलनेत दर्जेदार डाळिंबांना चांगला दर मिळत आहे. सोलापूरच्या बोरांचा हंगाम संपल्याने रविवारी अवघ्या वीस गोण्यांची आवक झाली. उन्हाच्या चटक्यामुळे घरगुती ग्राहकांसह शहरातील लिंबू सरबत, रसवंतिगृहे आदी ठिकाणाहून लिंबांना मागणी वाढली आहे. त्यातुलनेत आवक कमी पडल्याने लिंबाच्या 15 ते 20 किलोच्या गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे:

लिंबे (प्रतिगोणी) : 300-1400, मोसंबी : (3 डझन) : 160-320, (4 डझन) : 70-140, संत्रा : (10 किलो) : 300-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-250, आरक्ता : 10-80, गणेश : 10-50, कलिंगड : 15-20, खरबूज : 12-20, पपई : 12-25, चिक्कू (दहा किलो) : 100-500, पेरु (20 किलो) : 600-800, अननस (1 डझन): 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 250-300, चेकनट 900-1000, उमराण 100-120, चण्यामण्या : 800-900. द्राक्षे : (15 किलो) : सुपर सोनाका 1000-1300, सोनाका 800-1000, जम्बो (10 किलो) 800-1300, स्ट्रॉबेरी (2 किलो) 100-300.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT