Lemon Pudhari
पुणे

Pune Fruit Market Prices: कच्च्या लिंबाला ग्राहकांची नापसंती; पुण्यात लिंबाच्या भावात मोठी घसरण

घाऊक बाजारात गोणीमागे ८०० रुपयांपर्यंत घट; पपई आणि डाळिंबाच्या दरात वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: लिंबाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून लहान व कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे. मात्र, या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने पुणेकरांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे.

परिणामी, घाऊक बाजारात लिंबाच्या भावात 15 ते 20 किलोच्या गोणीमागे 800 रुपयांनी घसरण झाली आहे. तर, किरकोळ बाजारात लिंबाच्या एका नगाची आठ ते दहा रुपयांना विक्री सुरू आहे. मागणीच्या तुलनेत आवक रोडावल्याने पपई आणि डाळिंबाच्या भावात किलोमागे पाच ते आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याउलट, कलिंगड आणि खरबूजाच्या भावात घट झाल्याचे सांगण्यात आले.

गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 10) मोसंबीची 25 ते 30 टन, संत्रा 1 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 10 ते 12 टेम्पो, लिंबाची सुमारे 1000 ते 1500 गोणी, कलिंगड 30 ते 40 टेम्पो, खरबूज 5 ते 6 टेम्पो, चिक्कू 1 हजार गोणी, पेरु 100 ते 150 क्रेट, अननस 5 ट्रक आणि हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेटी इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे:

लिंबे (प्रतिगोणी) : 300 ते 1200, मोसंबी : (3 डझन) : 180-450, (4 डझन) : 80-200, संत्रा : (10 किलो) : 300-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-200, आरक्ता : 10-50, गणेश : 10-30, कलिंगड : 10- 15, खरबूज : 12-20,

पपई : 12-25, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 400-600, अननस (1 डझन): 100-600, द्राक्षे : (15 किलो) : 400 - 1000, रत्नागिरी हापूस 5 ते 9 डझन (कच्चा) : 1200-3500, (तयार) : 2000 ते 3500. कर्नाटक : हापूस (3 ते 5 डझन) 800-1000, पायरी (4 डझन) 500-700, लालबाग (1 किलो) 25-30, बदाम (1 किलो) 30-40.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT