पुणे: मैत्रीच्या अतूट नात्याचा उत्सव असलेल्या मैत्रीदिनी रविवारी (दि. २) तरुणाई मैत्रीच्या रंगात रंगून गेली. सुटीचा दिवस असल्याने फर्ग्सुसन महाविद्यालय रस्ता, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्क आदी ठिकाणी सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला. शहरातील प्रमुख रस्ते, कॅफे, रेस्टॉरंट, मॉल आणि फूड स्ट्रीटवर तरुणांची गर्दी झाली.
जेनझींनी पार्टी करत आणि मित्र-मैत्रिणींसह रील्स बनवत हा दिवस सेलिब्रेट केला. सोशल मीडियावरही मित्र-मैत्रिणींबरोबर छायाचित्र, सेल्फी, व्हिडीओ, रील्स, खास संदेश पोस्ट करण्यात आले. एक कप कॉफीपासून ते रात्रीच्या डिनर पार्टीपर्यंत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने मैत्री दिनाचे सेलिब्रेशन केले. मैत्रीच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजे मैत्री दिन. यंदाही मैत्री दिनानिमित्त शहरात दिवसभर आनंदी वातावरण होते. मैत्री दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमधील मित्रमंडळी एकत्र आली.
अनेकांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या. कॉफी आणि जेवणाच्या निमित्ताने एकत्र वेळ घालवला. तर नव्या पिढीने मैत्रीचा उत्सव आधुनिक पद्धतीने साजरा केला. अनेकांनी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला, तर काहींनी फिरायला जाण्यास प्राधान्य दिले. पुण्यात सायंकाळनंतर फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर, कोरेगाव पार्क आदी ठिकाणी मैत्री दिन साजरा करण्यासाठी गर्दी दिसून आली.
शहरातील कॅफे, रेस्टॉरंट आणि फूड स्ट्रीटवर मित्रांचे ग्रुप गप्पा मारताना दिसत होते. मैत्रिणींनी शॉपिंग करत आणि पार्टी करत मैत्री दिन साजरा केला. मॉलमध्येही सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला. ज्येष्ठ नागरिकांनीही हा दिवस आनंदात साजरा केला. निवृत्त सहकारी आणि शाळा-महाविद्यालयातील जुन्या मित्रांमध्ये गप्पांचा फड रंगला. काही युवक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि एक्सवर दिवसभर मैत्री दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. मित्रांसोबतची जुनी छायाचित्रे, शाळा-महाविद्यालयाच्या आठवणी, प्रवासातील क्षण, भावनिक संदेश आणि मित्र-मैत्रिणींसोबतचे रील्स मोठ्या प्रमाणात पोस्ट करण्यात आले. अनेकांनी दूर राहणाऱ्या मित्रांना व्हिडीओ कॉल करून शुभेच्छा दिल्या. कॅफेमधील गप्पा, सोशल मीडियावरील रील्स, जुन्या आठवणींना उजाळा आणि मित्रांसोबत घालवलेले निवांत क्षण यामुळे यंदाचा मैत्री दिन खास ठरला.
जेनझींचेही हटके सेलिब्रेशन
यंदाच्या मैत्री दिनात जेनझी पिढीचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. मित्र-मैत्रिणींसोबत रील्स तयार करणे, ट्रेडिंग गाण्यांवर व्हिडीओ शूट करणे, 'बेस्टीज फॉरेव्हर'सारख्या कॅप्शनसह इन्स्टाग्राम स्टोरीज आणि पोस्ट शेअर करणे, थीम फोटोशूट, लाईव्ह म्युझिक, ब्रंच पार्टी, गेमिंग झोन आणि ग्रुप आउटिंगला तरुणाईने पसंती दिली. अनेकांनी मित्रांसाठी खास व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केले, तर काहींनी मैत्रीचा प्रवास दाखविणारे छोटे व्लॉग तयार केले.