पुणे: मुळा-मुठा नद्यांना आलेल्या नुकत्याच 20 ऑगस्टच्या तसेच जुलै 2024 च्या पुरामुळे पुण्यातील अनेक परिसर जलमय झाले होते. धरणांतून तुलनेने कमी विसर्ग सोडण्यात आला असतानाही हजारो नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. या घटनांमुळे पुणेकरांना भेडसावणार्या पुराचा धोका किती गंभीर बनला आहे, याचे वास्तव आता जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून उघड झाले आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, गेल्या 14 वर्षांत पुण्याला पुराचा धोका किमान 40 टक्क्यांनी वाढला आहे. जलसंपदा विभागाने 2011 मध्ये मुळा-मुठेची निळी पूररेषा 1,18,000 क्युसेक प्रवाहावर निश्चित केली होती. (Latest Pune News)
त्यानुसार बंडगार्डन बंधार्याजवळ हा प्रवाह 542.45 मीटर पातळीखाली राहिला पाहिजे, अशी माहिती पर्यावरणक्षेत्रात तथा माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर आणि पुष्कर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सारंग यादवाडकर म्हणाले की, पुण्यात येणार्या पुराची मूळ कारणे शोधण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केल्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार पुण्याला पुराचा धोका गेल्या 14 वर्षांत किमान 40 टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
बंडगार्डन बंधार्याजवळ निळ्या पूररेषेची पातळी 542.45 मी. आहे. म्हणजेच बंडगार्डन बंधार्यापाशी 1,18,000 क्युसेकचा प्रवाह 542.45 मी.ची पातळी न ओलांडता वाहून गेला पाहिजे. प्रत्यक्षात जलसंपदाच्या आकडेवारीनुसार परिस्थिती अतिशय गंभीर आहे.
विवेक वेलणकर म्हणाले की, 25 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता बंडगार्डन येथे 69,111 क्युसेक प्रवाह होता. मात्र, या प्रवाहाने 542.60 मी. ची पातळी गाठली होती. त्याच दिवशी सायंकाळी 88,888 क्युसेकचा प्रवाह 543.40 मी. च्या पातळीला पोहचला.
यावर्षी 20 ऑगस्ट रोजी बंडगार्डनजवळ 71,408 क्युसेकचा प्रवाह 542.70 मी. पातळीला वाहत होता. थोडक्यात, बंडगार्डनपाशी 1,18,000 चा प्रवाह ज्या पातळीला वाहायला पाहिजे. ती पातळी त्याच्या 58 टक्के प्रवाहानेच ओलांडली आहे आणि हे सातत्याने होत आहे. यामुळे नदीची पूरवहन क्षमता किमान 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे उघड झाले आहे. यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे.
यासंदर्भातले अजून एक परिमाण म्हणजे टेरी रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे पुण्यात वार्षिक पावसाचे प्रमाण 37.5 टक्क्यांनी वाढणार आहे तसेच ढगफुटीचे प्रमाणही भविष्यात वाढणार आहे. आजमितीला मुठा नदीवरची धरणे 99 टक्के भरली आहे.
अजून सप्टेंबर महिना पूर्ण जायचा आहे. या कालावधीत जर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला व धरणांमधून मोठा विसर्ग सोडावा लागला तर पुणेकरांना पुराचा मोठा फटका बसेल. राजकारणी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहत नाही. मात्र, याची झळ सामान्य नागरिकांना अनुभवावी लागली आहे, असे सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.