पूरबाधित परिसरावर पालिकेचा वॉच; सुसज्ज आपत्ती निवारण कक्षातून माहिती घेणार File Photo
पुणे

Pune Flood Alert: पूरबाधित परिसरावर पालिकेचा वॉच; सुसज्ज आपत्ती निवारण कक्षातून माहिती घेणार

500 सीसीटीव्ही व स्मार्ट पोल उभारणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यात गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरात मुळा-मुठा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. सिंहगड रस्त्यावरील एकतानगर येथे तर नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली होती.

यावर्षी ही परिस्थिती ओढवू नये यासाठी पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षांतर्गत पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांना पुराची आधी माहिती दिली जाणार आहे. यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे. (Latest Pune News)

पुणे महापालिकेने पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यावर्षी जोरात तयारी सुरू केली आहे. शहरात पूर आल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज आपत्ती निवारण कक्षामार्फत तातडीने मदत दिली जाणार आहे. यासाठी शहरात तब्बल 500 सीसीटीव्ही व 500 स्मार्ट पोल उभारण्याचे कामदेखील सुरू आहे. या स्मार्ट पोलवर सायरन यंत्रणा बसवून नागरिकांना पुराची त्वरित सूचना दिली जाणार असून त्यांना वेगाने दुसर्‍या जागी स्थलांतरित करता येणे शक्य होणार आहे.

25 कर्मचारी तैनात

आपत्ती व्यवस्थापन कक्षात 25 प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कक्षाची जबाबदारी संदीप खलाटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी पालिकेने खालील दूरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत. 020-25501269, 020-25506800, 020-67801500 या क्रमांकावर फोन करून मदत मागावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

धोका ओळखून तातडीचा प्रतिसाद

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील पूरप्रवण भागांची ओळख पटवून त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये सिंहगड परिसरातील एकतानगरीसह काही इतर भागांचा समावेश आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही बसवून घटनांवर सातत्याने नजर ठेवली जाणार आहे.

धरणातून विसर्गाची तत्काळ माहिती

महापालिकेने जलसंपदा विभागात 9 अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यास ही माहिती तत्काळ पालिकेला देण्यात येईल. या माहितीच्या आधारे पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच नागरिकांना सावध करता येणार आहे. धरणांवर स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्यात आली असून, त्यामुळे पडणार्‍या पावसाचे मोजमाप अचूकपणे करता येणार आहे.

71 निवारा केंद्रांची व्यवस्था

आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक ठरल्यास, 15 क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत 71 निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही केंद्रे आपत्कालीन काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वापरली जातील. महापालिका आणि पोलिस प्रशासन एकत्रितपणे 1400 ते 2000 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे शहरावर लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे दुर्घटना घडली तरी त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

शहरात पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांना त्वरित मदत करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीत आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे. येथून शहरावर नजर ठेवली जाणार आहे. नागरिकांनी आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधून माहिती किंवा मदत मागितल्यास त्यांना तत्काळ मदत दिली जाणार आहे.
-संदीप खलाटे, प्रमुख- आपत्ती निवारण कक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT