

पुणे: कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणात कोंढवा पोलिसांनी संशयित तरुणाला नोटीस बजावली आहे. त्याला अटक न करता तपासात सहकार्य करणे तसेच बोलावल्यानंतर पोलिस ठाण्यात हजर होण्यासंदर्भात ही नोटीस देण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
पोलिसांच्या तपासात तो तरुण तिचा मित्र असल्याचे पुढे आले होते. सुरुवातीला तरुणीने त्याला आपण ओळखत नाही असे, सांगितले होते; परंतु पोलिसांनी तिच्यासमोर तरुणाच्या ओळखीचे पुरावे दिल्यानंतर तिने आपण त्याला ओळखत असल्याचे म्हटले. कुरिअर बॉयने आपल्या तोंडावर स्प्रे मारून अत्याचार केल्याचे तरुणीने म्हटले होते. (Latest Pune News)
मात्र, पोलिसांनी दिवस-रात्र केलेल्या तपासात तरुणीच्या तोंडावर ना स्प्रे मारण्यात आला होता, ना तिच्या सोबत फोटो काढून त्यावर मी परत येईल, असे लिहिले होते. तरुणीनेच एका अॅपच्या माध्यमातून फोटो एडीट करून त्यावर मजकूर लिहिला होता, तर दुसरीकडे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाने तिनेच आपल्याला बोलविल्यानंतर आपण तिच्या घरी गेल्याचा दावा केला होता. दरम्यान, एकंदर या प्रकरणातील गुंतागुंत पाहता पोलिसांनी संशयित आरोपी तरुणाला नोटीस देऊन सोडले आहे.
अभियंता तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी तब्बल 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तरुणीच्या घरी आलेल्या तरुणाची ओळख पटविली. त्यानंतर शुक्रवारी (दि. 4) सकाळी एका लग्नातून गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत कोंढवा पोलिस ठाण्यात नेले.
यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी तरुणी आणि त्याची समोरासमोर चौकशी करत त्यांच्या आई-वडिलांनादेखील याबाबत माहिती दिली. कायद्यानुसार या प्रकरणात संशयित तरुणाला पोलिसांनी अटक न करता त्याला पुण्याबाहेर जायचे नाही. पोलिसांनी बोलावल्यानंतर पोलिस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात नोटीस दिली. दरम्यान, तरुणीने काही गोष्टी आपण पोलिसांना सांगितलेल्या खोट्या असल्या, तरी त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.