Flex Hoardings Controversy Pudhari
पुणे

Pune Flex Hoardings Controversy: मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना हरताळ; पुण्यात अभिनंदनाच्या नावाखाली फ्लेक्सबाजीचा धुमाकूळ

महापौर-उपमहापौर निवडीनंतर चौकाचौकांत होर्डिंग्ज; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका निवडणुकीदरम्यान होर्डिंग्ज आणि फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होऊ नये, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र निवडणुकीचा धुरळा खाली बसताच पुणे शहरात अभिनंदनाच्या नावाखाली फ्लेक्सबाजीला अक्षरशः ऊत आला आहे. महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांच्या निवडीनंतर चौकाचौकांत अभिनंदनाचे फलक झळकू लागले असून, मुख्यमंत्र्यांच्या आदेशांकडेच दुर्लक्ष झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अनधिकृत फ्लेक्समुळे वाहतूक कोंडी, सुरक्षिततेचे प्रश्न, शहर सौंदर्य आणि पर्यावरणाचा ऱ्हास असे विविध प्रश्न निर्माण होत असल्याची बाब स्वतः मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत अधोरेखित केली होती. त्यानंतर शहर भाजपने ‌’फ्लेक्समुक्त पुणे‌’चा निर्धार जाहीर केला होता. भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत कार्यकर्त्यांना फ्लेक्स न लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तथापि, महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अभिनंदनासाठी शहरभर फ्लेक्स लागले. 9 फेबुवारी रोजी महापौर आणि उपमहापौरांची निवड होताच या फ्लेक्सबाजीने आणखी जोर धरला. बाजीराव रस्ता, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, स्वारगेट, सिंहगड रस्ता, धायरी, महर्षिनगर आदी भागांत अभिनंदनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज झळकू लागले आहेत.

कार्यकर्तेच सुटले बेफाम; कारवाई करणार कोण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश तसेच प्रदेश सरचिटणीसांनी पाठवलेले पत्र याकडे कार्यकर्त्यांनी गांभीर्याने पाहिले नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सत्तेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच शहर सौंदर्याच्या प्रश्नांवर हरताळ फासण्यात आल्याची टीका होत आहे. पक्षाचेच कार्यकर्ते आदेश पाळत नसतील तर कारवाई कोण करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाकडून बघ्याची भूमिका

निवडणुकीपूर्वी आयुक्त राम यांनी अनधिकृत फ्लेक्सबाजीविरोधात आक्रमक कारवाई केली होती. मात्र निवडणुकीनंतर तीच आक्रमकता दिसून येत नसल्याची चर्चा आहे. कोणतीही गय केली जाणार नाही, असे सांगणारे प्रशासन आता बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स असल्याने कारवाई होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले असतील, तर अनधिकृत सर्व फ्लेक्स तत्काळ काढून घेण्याच्या सूचना दिल्या जातील.
मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT