पुणे: ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेतील गणेशभक्तांची मांदियाळी आणि रंगांची मुक्त उधळण अशा उत्साही वातावरणात 'पुणे फेस्टिव्हल'तर्फे आयोजित 'मंगलाचरण सोहळा' रंगला. अलका चौकातील सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळ पुणे फेस्टिव्हलच्या बोधचिन्हाच्या भव्य रांगोळीचे अनावरण करून यंदाच्या सांस्कृतिक पर्वाची नांदी देण्यात आली.
राष्ट्रीय कला अकादमी न्यासचे अमर लांडे आणि सहकाऱ्यांनी पुणे फेस्टिव्हलच्या बोधचिन्हाची आकर्षक रांगोळी साकारली. शिवमुद्रा ढोल पथकाच्या स्थिर वादनाने सोहळ्याला सुरुवात झाली.
या वेळी खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजूषा नागपुरे, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई यांच्यासह मान्यवरांनी ढोल-झांज वादनाचा आनंद घेतला. कुलकर्णी, नागपुरे, गोयल आणि देसाई यांनी धरलेल्या फुगडीच्या फेराने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी मानाच्या पाचही गणपती मंडळांसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'शुभकार्याच्या प्रारंभी कल्याण आणि मंगलतेसाठी केली जाणारी प्रार्थना म्हणजे मंगलाचरण. त्याच संकल्पनेतून हा आगळावेगळा सोहळा आयोजित केला आहे,' असे गोयल यांनी सांगितले.