Ganesh Kala Krida Manch Pudhari
पुणे

Pune Festival: पुणे फेस्टिव्हलमध्ये हास्याऐवजी उकाड्याचा सामना; गणेश कला क्रीडा मंचात प्रेक्षक हैराण

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ पाहण्यासाठी खचाखच भरलेल्या सभागृहात ब्लोअर अपुरे; महापालिकेच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवाच्या उत्साहात 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' पाहण्यासाठी गणेश कला क्रीडा मंचमध्ये दाखल झालेल्या पुणेकरांना मंगळवारी हास्यापेक्षा उकाड्याचाच सामना करावा लागला. पुणे फेस्टिव्हलच्या कार्यक्रमासाठी सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. बाहेर पावसाची सर सुरू असताना सभागृहात आलेल्या प्रेक्षकांना मात्र घामाच्या धारा लागल्या होत्या. हवा खेळती ठेवण्यासाठीचे ब्लोअर व्यवस्थित सुरू नसल्याने रसिक अक्षरशः हैराण झाले. अखेर कार्यक्रमाचा आनंद घेण्याऐवजी निमंत्रण पत्रिका आणि हातातील साहित्याने स्वतःला वारा घालण्यातच अनेकांचा वेळ गेला.

विशेष म्हणजे सभागृहातील सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या सांस्कृतिक व विद्युत विभागाचे अधिकारीही कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. मात्र, यंत्रणा सुरळीत करण्याऐवजी त्यांनाही प्रेक्षकांप्रमाणेच उकाड्याचा सामना करावा लागला. त्यामुळे कार्यक्रमापूर्वी सभागृहातील मूलभूत सुविधांची पाहणी होते की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गणेश कला क्रीडा मंच हे महापालिकेच्या प्रमुख सांस्कृतिक सभागृहांपैकी एक आहे. येथे सांस्कृतिक, संगीत, नाट्य, प्रदर्शनांसह विविध सार्वजनिक आणि महापालिकेचे कार्यक्रम होतात. अशा महत्त्वाच्या सभागृहातील एसी पूर्ण क्षमतेने कार्यरत नसणे आणि गर्दीच्या वेळी हवा खेळती ठेवणारी यंत्रणाही अपुरी पडणे, ही बाब महापालिकेच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तसेच, सभागृहातील स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला. मोठा कार्यक्रम होण्यापूर्वी वातानुकूलन यंत्रणा, ब्लोअर, स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता तपासणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.

कोट्यवधींचा खर्च नेमका जातो कुठे?

दरवर्षी महापालिका सभागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही प्रमुख सभागृहात नागरिकांना उकाडा, अपुरी हवा आणि अस्वच्छतेला सामोरे जावे लागत असेल, तर हा खर्च नेमका जातो कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.

सभागृहातील यंत्रणा पूर्ण वातानुकूलित नसून तेथे ब्लोअरची व्यवस्था आहे. कार्यक्रमाच्या वेळी ब्लोअर सुरू होते; तरीही उकाडा जाणवत होता, हे मी स्वतः उपस्थित असल्यामुळे अनुभवले. काही कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून कुलर लावले जातात; मात्र सभागृहात कायमस्वरूपी अधिक चांगली हवा खेळती रहावी, यासाठी छतावरील मोठे पंखे किंवा कुलरची व्यवस्था करण्याबाबत विद्युत विभागाकडे मागणी केली आहे. त्यासाठी मंजुरी देण्यात आली असून, पुढील आठवड्यात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
राजेश कामठे, प्रशासन अधिकारी, सांस्कृतिक विभाग, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT