Pune FC Road Encroachment Pudhari
पुणे

Pune FC Road Encroachment: एफसी रस्त्यावर अतिक्रमण कायम; महापालिका कारवाई केवळ घोषणांपुरती?

पदपथांवरील पथारी हटल्या तरी पार्किंग, फ्रंट आणि साईड मार्जिनमधील अनधिकृत व्यवसायांवर अद्याप प्रभावी कारवाई नाही

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील अत्यंत वर्दळीच्या नामदार गोखले रस्त्यावर (एफसी रस्ता) पदपथांवरील अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर महापालिकेला काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, तरी इमारतींच्या पार्किंग, फ्रंट आणि साईड मार्जिनमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर अद्यापही प्रभावी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे महापालिका आणि पोलिस प्रशासनाचे आश्वासन केवळ घोषणांपुरतेच मर्यादित राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि बांधकाम विभागामार्फत संयुक्तपणे कारवाया केल्या जातात. बहुतांश कारवाया क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवरच राबवल्या जातात. मात्र, कारवाईपूर्वीच संबंधित व्यावसायिकांना ‌‘सूचना‌’ मिळत असल्याने अनेक ठिकाणी अतिक्रमणे आधीच हटवली जातात. त्यानंतर कारवाई पूर्ण होताच काही वेळातच ही अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत होते. त्यामुळे प्रशासनाची मोहीम ही केवळ दिखावा असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

इतर भागांतही अशीच स्थिती

नामदार गोखले रस्त्याबरोबरच लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, स्वारगेट परिसर, नवा पूल, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) तसेच जुना बाजार परिसरातही अनधिकृत विक्रेत्यांनी पदपथ आणि रस्ते व्यापल्याचे चित्र आहे. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी पादचाऱ्यांना पदपथांवरून चालणेही कठीण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

आयुक्तांच्या घोषणांचे काय झाले?

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी 11 मार्च 2026 रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेत शहरातील पदपथ, पार्किंग, फ्रंट आणि साईड मार्जिनमधील अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली होती. एफसी रोड आणि काही खासगी ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर मोहीम राबवून कारवाई केली जाईल, असा दावा दोन्ही आयुक्तांनी केला होता.

तसेच, पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर, गोदामे आणि परवानगीशिवाय सुरू असलेल्या व्यवसायांवर कठोर पावले उचलली जातील, असेही स्पष्ट केले होते. फर्ग्युसन रस्त्यासह शहरातील इतर भागांचे चित्र लवकरच बदलेल, असे आश्वासनही प्रशासनाने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पदपथांवरील काही पथारी हटल्या असल्या तरी साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन आणि पार्किंगमधील व्यवसाय आजही बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT