Money Pudhari
पुणे

Pune Agriculture Subsidy: पुणे जिल्ह्यातील 29,700 शेतकऱ्यांना ₹148.98 कोटींचे अनुदान; कृषी यांत्रिकीकरणाला सर्वाधिक निधी

महाडीबीटीद्वारे विविध योजनांचा लाभ; ट्रॅक्टर व कृषी अवजारांसाठी शेतकऱ्यांचा वाढता कल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी पुणे जिल्ह्यात गतवर्ष 2025-26 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 148 कोटी 98 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे, तर एकूण लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 29 हजार 700 आहे. त्यामध्ये योजनेतून सर्वाधिक 97 कोटी 74 लाख रुपयांइतके अनुदान हे कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

कृषी योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित आहे. या पोर्टलवर ‌’प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य‌’ या तत्त्वावर निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावरून मोका तपासणी (शेती अथवा खरेदी केलेल्या वस्तूंची अधिकाऱ्यांकडून स्थळपाहणी) करण्यात येते.

त्यानंतर ‌’एसएनए-स्पर्श प्रणाली‌’द्वारे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा केलेले आहे. शेतीमध्ये सध्या मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतकऱ्यांचा कल हा यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याकडे वाढत चालला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून यांत्रिकीकरण अभियानातील बहुतांश योजनेत अधिक अर्ज आल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, कृषी यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठी रस्सीखेच राहते. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना सुमारे एक लाख, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व प्रवर्ग व अल्प-अत्यल्प भूधारक महिला प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. शिवाय शेती मशागतीपासून ते पेरणी, पीक काढणीपर्यंतच्या अवजारांमुळे मजुरांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण बरेच कमी होते. त्यादृष्टीने गतवर्ष 2025-26 मध्ये जिल्ह्यात एकूण 2 हजार 902 ट्रॅक्टरची नव्याने भर पडल्याचेही काचोळे यांनी सांगितले.

जिल्ह्यात कृषी योजनांसाठी 2025-26 मध्ये वितरित अनुदान रक्कम व शेतकरी.

योजना अनुदान रक्कम शेतकरीसंख्या कोटीत

1 कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान 24.36 3482

2 राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण 60.4 6096

3 राष्ट्रीय कृषी विकास योजना- कृषी यांत्रिकीकरण 12.98 3353

4 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 6.5 400

5 राष्ट्रीय कृषी विकास योजना-फलोत्पादन 1.86 272

6 राष्ट्रीय कृषी विकास योजना - सूक्ष्म सिंचन 25.2 8014

7 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 11.97 5782

8 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 5.71 2301

एकूण 148.98 कोटी 29700

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT