Divorce Case Pudhari
पुणे

Video Conferencing Divorce: पुण्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तीन तारखांत घटस्फोट मंजूर

तंत्रज्ञानामुळे न्यायप्रक्रिया जलद; परस्पर संमतीने विवाह संपुष्टात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आधुनिक तंत्रज्ञानामुळे न्यायालयीन प्रक्रियेत मोठे बदल होत असून, त्याचा प्रत्यय पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात आला आहे. पोर्तुगालमध्ये राहणारा पती आणि पुण्यात राहणाऱ्या पत्नीचा परस्पर संमतीने केवळ तीन तारखांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घटस्फोट मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शाम रुक्मे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

वैभव आणि वैभवी (नावे बदललेली) हे दोघे मूळचे कोलकाता येथील असून, 2014 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या या दाम्पत्याने नंतर पुण्यात स्थायिक होत जीवन सुरू केले. मात्र, नोकरीनिमित्त पती पोर्तुगालला गेल्यानंतर दोघांमध्ये दुरावा वाढला आणि जानेवारी 2021 पासून ते वेगळे राहत होते. अखेर परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला.

दाम्पत्याला अपत्य नसून, मालमत्तेबाबत कोणताही वाद नव्हता. संबंधित दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून विभक्त राहत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सहा महिन्यांचा ‌‘कूलिंग पिरियड‌’ वगळण्याची मागणी अर्जदारांच्या वतीने ॲड. सचिनकुमार गेलडा यांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केला.

तीन तारखांत कशी झाली पूर्ण प्रक्रिया?

  • पहिली तारीख : घटस्फोटाचा अर्ज दाखल

  • दुसरी तारीख : समुपदेशन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोघांशी संवाद; एकमताची खात्री

  • तिसरी तारीख : न्यायालयीन सुनावणी व व्हिडिओद्वारे संवाद; घटस्फोट मंजूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT