Electric Bus Trial
पुणे : पीएमपीच्या ताफ्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाली असून, मंगळवारी (दि.१६) शहरातील कात्रज- हिंजवडी मार्गावर तिची ट्रायल घेण्यात आली. पूर्णतः अत्याधुनिक आणि वातानूकुलीत असलेली ही बस पुढील आठ ते दहा दिवस शहरातील चार मार्गांवर धावणार आहे. ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच शहरात डबलडेकर बसेस धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पीएमपीएमएल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या उपस्थितीत ही ट्रायल घेण्यात आली. या वेळी मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक अधिकारी नारायण करडे, कात्रज डेपो मॅनेजर राजेंद्र गाजरे, जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
सध्या मुंबईत डबलडेकर बसेस यशस्वीपणे धावत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही या बस आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर मंगळवारी शहरात डबलडेकर बस दाखल झाली.
शहरातील हिंजवडी फेज ३ ते हिंजवडी फेज ३ (वर्तुळ), रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सीटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर या चार मार्गांवर पुढील आठ ते दहा दिवस या बसची चाचणी होणार आहे. ट्रायलच्या यशस्वीतेनंतर पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुरुवातीला अशा १० डबलडेकर बसेस दाखल करण्याचे नियोजन आहे, असे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले.
- कंपनी : स्विच मोबिलिटी
- प्रवासी क्षमता : ६० (बसून), २५ (उभे), एकूण ८५ प्रवासी
- आकारमान : उंची ४.७५ मीटर, रुंदी २.६ मीटर, लांबी ९.५ मीटर
- किंमत : अंदाजे २ कोटी रुपये