Tamhini Ghat murder case
पुणे: व्यसनांच्या आहारी गेलेल्या लहान भावाशी झालेल्या वादातून त्याचा खून करणार्या व नंतर मृतदेह ताम्हिणी घाटात टाकून देणार्या मोठ्या भावाला वारजे माळवाडी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. नुकताच एक बेवारस मृतदेह ताम्हिणी घाटात सापडला होता.
ऋषिकेश अनिल शिर्के (वय 23, रा. गायकवाड चाळ, मावळे आळी, कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेशचा मोठा भाऊ अनिकेत अनिल शिर्के (वय 26) याला अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पौड पोलिसांना मिळाली होती. (Latest Pune News)
खून झालेल्या तरुणाची ओळखही पटलेली नव्हती. पौड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. आरोपी अनिकेतने लहान भाऊ ऋषिकेशचा ताम्हिणी घाटात खून केल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिस ठण्यातील उपनिरीक्षक सचिन तरडे यांना खबर्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अनिकेतचा शोध घेण्यास सुरुवात केली.
अनिकेत हा कर्वेनगरमधील वनदेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीच्या परिसरात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने लहान भावाचा खून केल्याची कबुली दिली. भावाच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू केला.
वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी पौड पोलिसांशी संपर्क साधला. त्या वेळी शनिवारी पहाटे गोणवडी परिसरात एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडल्याचे पौड पोलिसांनी सांगितले. आरोपी अनिकेतला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पौड पोलिसांकडून या प्रकरणात तपास करण्यात येत आहे.
परिमंडल तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धेंडे, पोलिस निरीक्षक गुन्हे नीलेश बडाख, पोलिस उपनिरीक्षक सचिन तरडे, उपनिरीक्षक संजय नरळे यांच्यासह अंमलदारांच्या पथकाने ही कामगिरी केली.
व्यसन सोडण्यावरून झाला होता वाद
अनिकेत आणि ऋषिकेश शुक्रवारी (दि. 25 जुलै) रात्री कर्वेनगरमधून दुचाकीवरून रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील गोळवशी-शिर्केवाडीत देवदर्शनासाठी निघाले. दोघे मध्यरात्री ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाजवळ थांबले. ऋषिकेशला दारू आणि गांजाचे व्यसन होते. अनिकेतने ऋषिकेशला व्यसन सोडण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात अनिकेतने ऋषिकेशवर धारदार हत्याराने वार केले. ऋषिकेशचा मृत्यू झाल्यानंतर अनिकेत पसार झाला.