शंकर कवडे
पुणे: महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला आता खाद्यतेलाच्या दरवाढीचा चटका बसला आहे. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पॅकिंगचा अतिरिक्त खर्च वाढल्याने विविध खाद्यतेलांच्या दरात लिटरमागे २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्याच्या किराणा खर्चात आणखी भर पडणार असून, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत खाद्यतेल विक्रेते आणि उत्पादकांविरोधात तपासणी व कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. अन्नसुरक्षा नियमांनुसार खाद्यतेलाची विक्री निर्धारित निकषांनुसार होणे बंधनकारक आहे. त्यानुसार सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
सुटे तेल विक्री होत असताना पॅकिंगचा खर्च नसल्याने ग्राहकांना तुलनेने कमी दरात तेल उपलब्ध होत होते. मात्र, आता तेल पॅकबंद स्वरूपात विकावे लागत असल्याने प्लास्टिक पिशवी अथवा बाटली, लेबलिंग आणि पॅकिंगसाठी होणारा अतिरिक्त खर्च तेलाच्या अंतिम किमतीत समाविष्ट झाला आहे. परिणामी, विविध खाद्यतेलांचे किरकोळ दर लिटरमागे २० ते २५ रुपयांनी वाढल्याचे श्री रामकृष्ण ऑईल मिल्सचे आनंद पटेल यांनी सांगितले.
५०-१०० मिलिलिटर तेल घेणाऱ्यांना सर्वाधिक फटका
शहरातील कष्टकरी आणि अल्प उत्पन्न गटातील अनेक कुटुंबे आजही आर्थिक उपलब्धतेनुसार ५० किंवा १०० मिलिलिटर सुटे तेल खरेदी करतात. मात्र, सुट्या तेलाच्या विक्रीवरील निर्बंधांमुळे अशा ग्राहकांसमोर पॅकबंद तेल खरेदी करण्याचा पर्याय उरणार आहे. त्यामुळे एकाचवेळी जास्त पैसे खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. सुरक्षित आणि दर्जेदार तेल उपलब्ध होणार असले, तरी वाढलेल्या किमतीमुळे गरीब कुटुंबांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.