Pune Dry Day Pudhari
पुणे

Pune Dry Day: पुण्यात तीन दिवसांऐवजी एकच दिवस ड्राय डे; हायकोर्टाच्या आदेशानंतर नवी तारीख वाचा

Pune Dry Day 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rahul Shelke

Pune Dry Day October 2026

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याच्या आदेशात बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या ड्राय डेच्या आदेशात न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारणा करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णयात बदल

महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील पाच सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

मात्र, या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर २१ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने आदेश दिला. त्यानुसार, मतदानाच्या दिवशी लागू असणारा ड्राय डे केवळ २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पुण्यात कोणत्या भागात मद्यविक्री बंद राहणार?

सुधारित आदेशानुसार, २३ ऑक्टोबर रोजी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे-१ यांच्या कार्यक्षेत्रात संबंधित मद्यविक्री मध्यरात्री १२ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहतील.

याशिवाय, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या बालेवाडी प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बार, वाइन शॉप आणि इतर मद्यविक्री केंद्रांनाही नियम लागू

या आदेशानुसार, संबंधित क्षेत्रातील देशी आणि विदेशी मद्यविक्रीची दुकाने, बीअर व वाइन विक्री केंद्रे, बार, स्टार हॉटेलमधील मद्यविक्री केंद्रे, क्लब आणि इतर मद्यविक्री दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशानुसार मद्यविक्री केंद्रे बंद ठेवणे बंधनकारक आहे. या कालावधीत दुकाने बंद ठेवल्याबद्दल कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नाही.

तसेच, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, १९४९ आणि त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे पुण्यातील संबंधित भागांतील मद्यविक्री दुकाने आणि बार चालकांनी सुधारित आदेशाचे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT