फर्ग्यूसन रस्त्यावर स्थित L3 पब येथे ड्रग्स सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल  File Photo
पुणे

Pune Drugs Case | गुन्हेगारांचा वाढला उच्छाद

पुढारी वृत्तसेवा

पुणे : एकेकाळचे विद्यावंतांचे, ज्ञानवंतांचे पुणे... विद्येचे माहेरघर असलेले पुणे. या शहराला आता कसले गलिच्छ स्वरूप आले आहे? शिक्षणात रममाण होणारी तरुणाई आता व्यसनांमध्ये धुंद होते आहे. तरुणाईला बरबाद करणार्‍या या व्यसनाधीनतेतून एक प्रश्न पुढे येतो, तब्बल तीन हजार सहाशे कोटींच्या ड्रगच्या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतरही पुन्हा तरुणांच्या हातापर्यंत ड्रग पोहचतेच कसे? पोलिस, उत्पादन शुल्क विभाग नेमके करतेय तरी काय? अमली पदार्थ तस्करीला नेमके अभय कुणाचे?

  • पुण्यात दोन व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे : दोघांमध्ये तरुणांकडून ड्रग्सचे सेवन केले जात आहे

  • पुण्यात गेल्या चार वर्षांत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ; सर्वसामान्यांना ह्याची झळ बसू लागली आहे

  • पुण्याची ह्या परिस्थितीला जवाबदार कोण? कोण देत आहे गुन्हेगारीला क्षय?

पुणे : विद्वत्तेचे शहर ते ड्रग्सचे शहर

भारतातील विविध राज्यांसह, राज्यातील विविध जिल्ह्यांतून नागरिक पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. पुण्याची खरी ओळख विद्येचे माहेरघर अशी असताना पुण्यात गुन्हेगारांचा उच्छाद वाढला आहे. ड्रगतस्करी रोखण्यासाठी शहरातील ड्रग पेडलर्स तसेच संशयितांना बोलावून आयुक्तालयात धडे देऊनही ड्रगतस्करी थांबू शकली नाही. त्यामुळे पुणे विद्येचे माहेरघर आहे की गुन्हेगारीयुक्त ड्रगचे? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होऊ लागला आहे. अमली पदार्थ, मद्य विक्रीच्या विळख्यात शहर असल्याने दुसरीकडे पालकही हवालदिल झाले आहेत.

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

शहरात मागील चार वर्षांमध्ये गुन्हेगारांच्या कृत्याची झळ सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहचली आहे. गुन्हेगारांना आपला राग व दहशत पसरवायची असेल तर ते सामान्य नागरिकांच्या गाड्यांना लक्ष्य करीत आहेत. मागील चार वर्षांत असंख्य तोडफोडींच्या घटनांमध्ये शेकडो वाहने फोडल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. शहरात विविध कोयता टोळ्यांनी तर धुडगूस घातला आहे. या टोळ्यांना आवर घालताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. चार वर्षांत तब्बल सव्वादोनशे टोळ्यांवर मोक्काची कारवाई झाली आहे. शेकडो गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई झाली, तडीपारी झाली, तरीही शहरातील गुन्हेगारी मात्र अद्यापही शांत होऊ शकली नाही.

ललित पाटील प्रकरण

2023 मध्ये पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातून चालणारे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. यामध्ये ललित पाटीलसारख्या म्होरख्यासह त्याच्या गुन्हेगारी टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती ड्रगचे कारखाने लागले होते. यामध्ये शेकडो रुपयांचे ड्रग जप्त झाले. या कारवाईनंतर शहरातील ड्रगतस्करी पुणेपणे नष्ट करण्यात आल्याचे बोलले जात असताना पुणे पोलिसांनी समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून थेट ड्रगतस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले.

जाणून घ्या ड्रग्सचं जेनेसिस

ससून रुग्णालयाच्या कारवाईत कुरकुंभ येथील एका कारखान्यात हे उत्पादन देशातील विविध भागांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रगतस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती. यामध्ये 1 हजार 837 किलो असे तब्बल 3 हजार 674 कोटींचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. हा तपास आता एनसीबीकडे वर्ग करण्यात आला आहे.

एवढे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर ड्रगतस्करी पूर्णपणे थांबल्याचे बोलले जात असतानाच आता पुण्यातील पबमध्ये ड्रग घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ड्रगची कारवाई थंड पडल्यानंतर पुन्हा एकदा ड्रगतस्कर अ‍ॅक्टिव्ह तर झाले नाहीत ना? हा ड्रगचा पुरवठा पार्टीत झाला कुठून? असे प्रश्नही आता उपस्थित होऊ लागले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT