ड्रग्स प्रकरणी L3 पबला टाळे ठोकण्यात आले आहे  Pudhari
पुणे

Pune Drugs Case | आता ‘कल्ट’ही रडारवर!

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आता ‘कल्ट’ पबवरही कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे ‘कल्ट’ पबसह संबंधितांवर कारवाईची टांगती तलवार आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हडपसर येथील हा पब सुरू असल्याचे निदर्शनास आले. आतील बाजूस गाणीही सुरू असल्याचे आढळून आले.

शनिवारी रात्री अक्षय कामठे याने हडपसर येथील ‘कल्ट’ पबमध्ये पार्टी आयोजित केली होती. तेथील पार्टी रात्री साडेबारा वाजता संपली होती. पार्टी संपल्यानंतर शिवाजीनगर येथील ‘एल-3’ मध्ये लेट नाइट पार्टी होणार असल्याची घोषणा माइकवरून करण्यात आली होती. याबाबत ‘एल-3’ मध्ये होणार्‍या पार्टीबाबत ‘कल्ट’चालकांना याची माहिती असतानाही त्यांनी गोपनीयता बाळगल्याने चालकाचा सहभाग लक्षात घेता, त्यांच्यावरही कारवाई करण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील हडपसर परिसरात असणार्‍या ‘कल्ट’मध्ये डिस्कोथेपसाठी परवानगी होती का किंवा विनापरवानगी नाचगाणी सुरू होती, त्या दृष्टिकोनातूनही आयुक्तांनी कारवाईची शक्यता वर्तवली आहे. या पबमध्ये रात्री अशा लेट नाइट पार्ट्या सुरू होत्या का, याचाही सध्या तपास सुरू आहे. ‘कल्ट’मध्ये पार्टी केल्यानंतर ‘एल-3’ पबमध्ये लेट नाइट पार्टी करण्यात येणार, असे मॅसेजही काही ग्रुपवर टाकण्यात आले होते. इव्हेंट मॅनेजर म्हणून अक्षय कामठे काम पाहत होता. याबाबत माहिती असतानाही ‘कल्ट’कडून पुढील पार्टीची बाब लपविण्यात आल्यानेदेखील त्याच्यावर कारवाईचे सूतोवाच आयुक्तांनी केले

पुण्यात रुजतेय ‘आफ्टर पार्टी’ कल्चर

कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात लेट नाईट चालणार्‍या पबवर टीका झाल्यानंतर शहरातील पब पोलिसांकडून वेळेत बंद करण्याचे कडक धोरण स्वीकारलेे. त्यानंतर पब वेळेत बंद झाले खरे. मात्र, यातून आयोजकांनी थर्ड पार्टी संकल्पना (आफ्टर पार्टी, असे नाव दिले आहे) सुरू केली. एल-3 हा त्याचाच एक भाग असल्याचे आता तपासातून निष्पन्न झाले आहे. पार्टी झाल्यानंतर आयोजक हॉटेलमध्ये अफ्टर पार्ट्यांचे आयोजन करत असल्याचा प्रकार एल-3 पार्टीनंतर उघड झाला. त्यात पहिल्या पार्टीतच पुढील पार्टी कोठे होणार आहे याची माहिती दिली जाते. मग, हे तरुण एकत्रित त्याठिकाणी जाऊन पुन्हा पार्टी करतात.

कल्याणीनगर पोर्शे कार अपघातानंतर पब वेळेत बंद होण्यास सुरुवात झाल्याने ’अफ्टर पार्टी’ची संकल्पना रूजत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एल-3 वर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार समोर आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील एल-3 पबमध्ये झालेल्या पार्टीत ड्रगचे सेवन केल्याची बाब समोर आली आहे.

ड्रग्स सेवन करणारे पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी मालक व चालक तसेच पार्टीचा आयोजक यांच्यासह सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओतील दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिस सखोल चौकशी करत आहेत. या चौकशीतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. इव्हेंट ऑर्गनायझर असलेला अक्षय कामठे याने पार्टी आयोजित केली होती. द कल्ट या हॉटेलमध्ये जवळपास 50 तरुण येथे सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT